सिन्नर ( नाशिक ) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात खरेदीचा उत्साह ओसंडून वाहात आहे. कपडे, फटाके, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सजावटीच्या वस्तूंपासून आकाशकंदील, फराळाचे साहित्य या सर्वच वस्तूंना मोठी मागणी असून, बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.
गणेश पेठ, नाशिक वेस, नवा पूल, सरदवाडी मार्ग, खासदार वेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावी वेस या भागांत रविवारी (दि. 19) आणि सोवारी (दि. 20) दिवसभर ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. कपड्यांच्या दुकानांत महिलांची आणि तरुणाईची लगबग लक्षणीय होती. रंगीबेरंगी आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू आणि दिवाळी फराळाच्या स्टॉल्सनी बाजारपेठ उजळून गेली होती.
प्लास्टिक फुलांचे आणि चिनी कंदील उपलब्ध असले, तरी नागरिक पर्यावरणपूरक कागदी व कापडी आकाशकंदील खरेदीस प्राधान्य देताना दिसत आहेत. 50 ते 500 रुपयांपर्यंत आकर्षक डिझाइनचे आकाशकंदील विक्रीस असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रांगोळी साहित्य, पणत्या, गृहसजावटीच्या वस्तूंनाही मोठी मागणी आहे. बाजारात चिनी वस्तूंची उपस्थिती कायम आहे. चिनी आकाशकंदील, विद्युत माळा, म ोबाइल उपकरणे आणि सजावटीच्या वस्तू स्वस्त दरामुळे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. मात्र या वस्तूंची हमी नसल्यामुळे काही ग्राहक सावधगिरी बाळगत आहेत. महिलांचा फराळ तयार करण्याचा उत्साह कायम असला, तरी नोकरी-व्यवसायामुळे वेळेअभावी रेडिमेड फराळाला यंदा चांगली मागणी आहे. शहरात अनेक ठिकाणी आचारींकडून लाडू, चिवडा आदी पदार्थांच्या ऑर्डर्स घेतल्या जात आहेत.
वाहतूक कोंडीची समस्या
गर्दीमुळे खासदार वेस, नवा पूल, लाल चौक आणि गणेश पेठ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. संपूर्ण दिवसभर वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले होते.
दिवाळीपूर्वीच खरेदीचा जोर वाढला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विक्रीत 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. शेतकर्यांनी आणि महिला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वस्त्रे, सजावटीच्या वस्तू आणि गिफ्ट आयटम्स घेतले. दिवाळीपूर्वी एवढी उलाढाल क्वचितच दिसते.संजय चोथवे, व्यापारी
शेतकरी वर्गही उत्साहात
यावर्षी समाधानकारक पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांचा आर्थिक आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी, शेतकरी वर्गही शहरात येऊन उत्साहाने खरेदी करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी तसेच सोने-चांदी खरेदीत ग्रामीण भागाचा लक्षणीय सहभाग असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
कुटुंबासह खरेदीसाठी आलो आणि बाजारपेठेत खूपच गजबज जाणवली. स्थानिक वस्तूंना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतोय. सगळे काही एका ठिकाणी मिळत असल्याने खरेदी सोपी झाली, पण वाहतूक कोंडीमुळे थोडा त्रास झाला.विजय शिंदे, ग्राहक