केंद्र सरकारने दिवाळीअगोदरच 'जीएसटी गिफ्ट' दिल्याने, बाजारात सर्वच क्षेत्रात विक्रमी उलाढाल होण्याचा अंदाज आहे.  pudhari news network
नाशिक

Diwali Shopping Bar : दिवाळीत 2500 कोटींच्या खरेदीचा बार

'जीएसटी गिफ्ट'चा बाजारपेठेत मोठा सकारात्मक परिणाम

पुढारी वृत्तसेवा

सतीश डोंगरे, नाशिक

'दिवाळी सण मोठा, खरेदीचा नाही तोटा' या उक्तीप्रमाणेच बाजारपेठेत खरेदीचा महाउत्सव बघावयास मिळत आहे. केंद्र सरकारने दिवाळीअगोदरच 'जीएसटी गिफ्ट' दिल्याने, बाजारात सर्वच क्षेत्रात विक्रमी उलाढाल होण्याचा अंदाज आहे. वाहन, सराफ, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, मिठाई, गिफ्ट, पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, फटाके तसेच कपडा बाजारात ग्राहकांची उदंड गर्दी बघावयास मिळत असून, कोट्यावधी रुपयांची दररोजची उलाढाल सुरू आहे. विक्रेत्यांच्या मते, यंदाच्या दिवाळीत अडीच हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे.

जीएसटी दर कमी केल्याने, वाहन बाजारात सध्या प्रचंड तेजी आहे. याशिवाय सराफ बाजारात मुहूर्तावर मोठी खरेदी होत आहे. वास्तविक, सोने-चांदी दरांनी विक्रमी झेप घेतली आहे. मात्र अशातही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे बघितले जात असल्याने, गुंतवणूकदार आणि मुहूर्तावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांमधील उत्साह कायम आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातही यंदाच्या दिवाळीचा लखलखाट बघावयास मिळत आहे. एकंदरीत ग्राहकांचा प्रतिसाद बघता यंदाची दिवाळी बाजाराला विक्रमी झळाळी देणारी ठरणार असल्याने, व्यापारी वर्ग चांगलाच सुखावल्याचे दिसून येत आहे. त्याबाबतचा हा सविस्तर वृत्तांत...

वाहन बाजारात आकर्षक सवलतींचा वर्षाव

जीएसटी दरात केलेल्या कपातीचा सर्वाधिक फायदा आॅटोमाेबाइल इंडस्ट्रीला झाला आहे. २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू झाल्याने, दिवाळीत नाशिकच्या वाहन बाजारात सुमारे एक हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे. दिवाळीत धनत्रयोदशी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी शुभ मानली जात असल्याने, त्यादृष्टीने आतापासूनच बुकींगचा धडाका सुरू आहे. केंद्राने जीएसटीचे गिफ्ट दिले असले तरी, ऑटोमोबाइल कंपन्या आणि डीलर्सकडून आकर्षक सवलतींचा ग्राहकांवर वर्षाव केला जात आहे. 'कॅशबॅक, एक्सचेंज बोनस, कमी व्याजदाराच्या कर्जाच्या ऑफर्स, हमखास गिफ्ट' आदींचा त्यात समावेश आहे. याशिवाय ऑटोमोबाइल कंपन्यांनी ग्राहकांच्या 'च्वॉइस' लक्षात घेवून अत्याधुनिक फिचर्स असलेल्या कार्स बाजारात उपलब्ध करून दिल्या आहेत. 'ईव्ही' चारचाकीही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. याशिवाय दुचाकीमध्ये स्पोर्ट्स बाइकसह स्टायलिश गाड्या बाजारात असल्याने दुचाकी बुकींगचाही जोरदार धडाका सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कुठलाच वाहनांना वेटींग नसल्याने, ग्राहकांना मुहूर्तावर वाहन घरी आणणे शक्य होणार आहे. विक्रेत्यांच्या अंदाजानुसार, वाहन बाजारात मुहूर्तावर पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे.

१२ हजार रेडी फ्लॅट्स

दिवाळीच्या मुहूर्तावर मालमत्ता खरेदी शुभ मानली जात असल्याने, या काळात गृह स्वप्नपूर्ती अनेकांकडून साकारली जाते. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी गृहप्रवेश केला. आता ज्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बुकींग केले होते, त्यांच्याकडून लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर गृह प्रवेशाचा योग साधला जाणार आहे. याशिवाय अनेक ग्राहक या योग साधण्यासाठी सध्या साइट व्हिजिट करताना दिसून येत आहे. शहराच्या चहुबाजुने मोठमोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. बांधकाम व्यावसायिकांच्या अंदाजानुसार, शहर व परिसरात तब्बल १२ हजार रेडी फ्लॅट्स आहेत. विकासकांनी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेवून, अनेक अॅमेनिटीज उपलब्ध करून दिल्या आहेत. २० लाखांपासून ते ४ कोटी रुपयांपर्यंतच्या फ्लॅट्चा यात समावेश आहे. विकासकांनी ग्राहकांसाठी विविध योजना देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. बुकींगवर दुचाकी, चारचाकी, ५२ इंच टीव्ही तसेच फुल फर्निश, मुद्रांक शुल्क माफी, कमी प्रक्रिया शुल्क आदींचा त्यात समावेश आहे. याशिवाय रो-हाऊस, प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यास ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. विकासकांच्या मते, नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात दिवाळीच्या मुहूर्तावर एक हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे.

गृहकर्जाचे व्याजदर चक्क ७ टक्क्यांवर

ग्राहकांना आपल्या स्वप्नातील घर साकारता यावे, यासाठी गृहकर्जाचे व्याजदर कमालीचे कमी केले आहेत. बहुतांश बँकांनी प्रकल्पस्थळीच व्याजदराची माहिती देणारे फलक लावले आहेत. त्यामुळे ग्राहकांना गृहकर्ज घेणे शक्य होत आहे. ७ टक्क्यांपासून ते ७.९० टक्क्यांपर्यंत इतका कमी व्याजदर असल्याने ग्राहकही घर घेण्याचे स्वप्न साकार करीत आहेत. जागतिक स्तरावर घडत असलेल्या घडामोडी बघता, घर घेण्याची हीच संधी असल्याचे विकासकांकडून आवर्जुन सांगितले जात आहे.

वाढत्या किंमतींमुळे सोने-चांदीतही बुकींगचा ट्रेंड

सोने आणि चांदीच्या किंमतींनी विक्रमी स्तर गाठला असून, दिवसागणिक होत उलथापालथीमुळे, दिवाळीच्या मुहूर्तावर सोने दीड लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत २४ कॅरेट सोने प्रति तोळा एक लाख २६ हजारांवर तर चांदीने एक लाख ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. सोने-चांदीच्या वाढत्या किंमती लक्षात घेता, ग्राहकांकडून आतापासूनच बुकींग केली जात आहे. सोने-चांदीच्या किंमती कितीही वाढल्या तरी, मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीची परंपरा अनेकांकडून पाळली जाते. मात्र, मुहूर्तावर दर वाढण्याची शक्यता असल्याने, आतापासूनच ग्राहकांकडून बुकींग केले जात आहे. ज्या दिवशी सोने बुकींग केले जाईल, त्याच दिवसाचा दर विक्रेत्यांकडून आकारला जात असल्याने, सराफ बाजारात सध्या बुकींगचा ट्रेंड चांगलाच हिट होत आहे. दरम्यान, ग्राहकांचा प्रतिसाद बघता, मुहूर्तावर सराफ बाजारात पाचशे कोटींपेक्षा अधिक गुंतवणूकीचा अंदाज आहे.

कपडा बाजारात रोजची उलाढाल वाढली

दिवाळीत नवीन कपडे घेण्याची प्रथा असल्याने, सहकुटुंब कपडे घेण्यासाठी दुकानात गर्दी केली जात आहे. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने, शहरातील शालिमार, मेनरोड, रविवार कारंजा यासह उपनगरांमधील बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी ग्राहकांकडून मोठी गर्दी केली जात आहे. काही दुकानांवर तर लांबच लांब रांगा लागत आहेत. ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे दिवाळीच्या आनंदावर काहीसे विरजन घातले असले तरी, बळीराजाकडून दिवाळीचा सण दरवर्षीप्रमाणेच थाटामाटात साजरा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय चाकरमान्यांच्या खात्यात बोनस जमा झाल्याने, देखील कपडा बाजारात नवीन कपडे खरेदीसाठी ग्राहकांकडून एकच गर्दी केली जात आहे.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही तेजीच्या माळा

दिवाळीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही मोठी तेजी बघावयास मिळत आहे. इलेक्टॉनिक्स वस्तू खरेदीसाठी ग्राहकांकडून मोठी गर्दी केली जात आहे. विक्रेत्यांनी याठिकाणी ग्राहकांवर ऑफर्सचा वर्षाव केल्याने, त्याचा ग्राहकांकडून मोठा लाभ घेतला जात आहे. टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, फॅन, एसी यासह अन्य वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी बघावयास मिळत आहे. क्रेडीट कार्डवर विशेष ऑफर्स दिल्याने, त्याचाही ग्राहकांकडून मोठा लाभ घेतला जात आहे. विक्रेत्यांच्या मते, इलेक्टॉनिक बाजारात १५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. याशिवाय मोबाइल विक्रीतूनही ५० कोटींपेक्षा अधिक उलाढालीचा अंदाज आहे. सजावटीचे साहित्यही मोठ्या प्रमाणात बाजारात आले असून, ते खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडत आहे. लाइटींगच्या माळा घरोघरी लागणार असल्याने, येथे खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.

पूजा साहित्य, मिठाई, सुकामेवा खरेदी जोरात

दिवाळीत घरोघरी लक्ष्मीपूजन केले जात असून, लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्यातूनही मोठी उलाढाल होत असते. सध्या बाजारात लक्ष्मी पूजनासाठी चौरंग, लाल कापड, हळदी- कुंकू, गंध, सुपारी, लवंग, अगरबत्ती, दिवा, तूप, गंगाजल, पंचामृत, सुट्टी फुले, लक्ष्मी- गणेशाची मूर्ती, लक्ष्मी यंत्र, फळे, कापूर, कापूस, बत्ताशे, चांदीची नाणी, कलश, नारळ, देठाची पाने, पेढे, फराळ, गोमतीचक्र, कवड्या, शंख, कमळाचे फूल, आंब्याची पाने, कमळ गट्टा, धूप, सुका मेवा, खीर, ताम्हण आदी साहित्य आणण्यात आले असून, ते खरेदीसाठी ग्राहकांकडून एकच गर्दी केली जात आहे. याशिवाय मिठाई आणि सुकामेवा खरेदीलाही याकाळात प्राधान्य दिले जात असल्याने, मिठाई आणि सुकामेवा बाजारात तेजी दिसून येत आहे.

किराणा साहित्य, रेडीमेड फराळ खरेदीसाठी गर्दी

दिवाळी सण म्हटला की, रूचकर, स्वादिष्ट फराळ आलाच. त्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांकडून शहरातील मुख्य बाजारपेठांमधील किराणा दुकानांमध्ये मोठी गर्दी केली जात आहे. याशिवाय बाजारात रेडीमेड फराळही उपलब्ध करून देण्यात आले असून, ते खरेदीसाठी देखील ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे विक्रेते सुखावले आहेत.

फटाका मार्केटमध्ये गर्दीच गर्दी

फटाका मार्केटमध्येही मोठी उलाढाल होण्याचा अंदाज आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. फटाके खरेदीसाठी ग्राहकांकडून गर्दी केली जात आहे. मात्र, पर्यावरणाची हानी होवू नये, यासाठी नागरिकांनी कमी आवाजाचे फटाके फोडावेत. किंवा फटाके फोडणे टाळावेत, असे आवाहन विविध पर्यावरणवादी संघटनांकडून केले जात आहे. मागील काही दिवसांपासून इको फ्रेडली दिवाळी साजरी करण्याचा नाशिककरांकडून प्रयत्न केला जात असून, यंदाही असा संकल्प करावा, असे आवाहनही या संघटनांकडून केले जात आहे.

(आकडेवारी विक्रेत्यांच्या अंदाजानुसार)

  • रिअल इस्टेट - १००० कोटी

  • वाहन बाजार - ५०० कोटी

  • सराफ बाजार - ५०० कोटी

  • कपडा बाजार - १०० कोटी

  • इलेक्ट्रॉनिक बाजार - १५० कोटी

  • मोबाइल - ५० कोटी

  • पूजेचे साहित्य - १० कोटी

  • मिठाई, गिफ्ट - २५ कोटी

  • सुकामेवा - १० कोटी

  • सजावटीचे साहित्य : १० कोटी

  • फटाके - १० कोटी

  • किराणा साहित्य - २० कोटी

दसऱ्याच्या मुहूर्तापासूनच दिवाळी सुरू झाली आहे. ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत असून, साइट व्हिजिट वाढल्या आहेत. अनेकांना दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करायचा असल्याने, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. जीएसटी बुस्टचा मोठा फायदा झाला आहे.
भगवान काळे, श्रीजी बिल्डर्स
सोने, चांदीचे भाव वाढले असले तरी, खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. सोने-चांदी खरेदीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघितले जात असल्याने, ग्राहकांची गर्दी कायम आहे. याशिवाय मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा अनेकांकडून पाळली जात असल्याने, दिवाळीत मोठी उलाढाल होणार आहे.
मयूर शहाणे, मयूर अलंकार
ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम आहे. यंदा बाजारात उत्साहाचे वातावरण असून, ग्राहकांकडून जोरात खरेदी केली जात आहे. सध्या बुकींगला प्राधान्य दिले जात असून, मुहूर्तावर अनेकांना डिलिव्हरी घ्यायची आहे. ग्राहकांसाठी विविध ऑफर्सही उपलब्ध करून दिल्या आहेत.
मुकेश मुंदडा, मुंदडा काॅर्पोरेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT