ठळक मुद्दे
दिवाळी सणाचे निमित्त : राज्यातील विविध कांदा बाजारपेठा तब्बल ११ दिवस बंद
तोट्यात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखी भर
जास्त दिवस बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवणे हे अन्यायकारक
नाशिक : दिवाळी सणाचे निमित्त समोर ठेवून राज्यातील विविध कांदा बाजारपेठा तब्बल ११ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आधीच तोट्यात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखी भर पडली आहे, असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.
दिघोळे म्हणाले, शेतकरी दिवसरात्र राबून कांद्याचे उत्पादन घेतो आणि त्याचा माल विक्रीसाठी आणल्यावर बाजार बंद असल्याची पाटी त्याच्या तोंडावर आपटली जाते. शेतकऱ्यांना दगड समजून त्यावर चालल्यासारखी वागणूक देणे आता थांबवले पाहिजे. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असून, शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभमुहूर्तावरही अन्यायच मिळतो. राज्य शासनाने बाजार समित्यांना शिस्त लावणे अत्यावश्यक आहे. बाजारपेठा कोणाच्या खासगी मालकीच्या नसून, त्या शेतकऱ्यांच्या श्रम आणि उत्पादनावर उभ्या आहेत. जास्त दिवस बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवणे हे अन्यायकारक आहे.
लिलाव बंद ठेवण्याचे अधिकार हे सणाचे प्रमुख दिवसांपूरते मर्यादित असावेत आणि शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचवणारे निर्णय घेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. शासनाने तातडीने या मुद्यावर लक्ष घालून शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. आधीच शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता एकाच वेळी जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्या तर पुन्हा बाजार समित्या सुरू झाल्यानंतर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढून यापेक्षाही कमी दर मिळण्याचे संकट शेतकऱ्यांवर येईल. त्यामुळे राज्य सरकारने कांदा बाजारपेठेचे सुयोग्य नियमन आणि पारदर्शक व्यवहारासाठी ठोस धोरणाची अंमलबजावणी करावी, असेही दिघोळे यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ : बाजार समितीच्या नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन
येवला (नाशिक) : येथील बाजार समितीत शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी १.५० कोटींचा निधी दिला जाईल. याचा प्रस्ताव बाजार समितीने तातडीने पाठवावा. कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर प्रकल्प उभारण्यात येत आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मदत उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला बाजार समितीच्या नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि.18) सकाळी दहा वाजता मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, तहसीलदार आबा महाजन, पालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सहायक निबंधक राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, वसंत पवार, शिवसेनेचे नेते संभाजी पवार, येवला बाजार समितीच्या सभापती सविता पवार, उपसभापती संध्या पगारे, रायभान काळे, किसन धनगे, संचालक संजय बनकर, दत्ता निकम, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासकीय कार्यालय चांगले असले पाहिजे. त्यादृष्टीने हे तयार केलेली येवला बाजार समितीची ही इमारत फक्त एक कार्यालय नाही, तर ती शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय आहे. शेती क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. शेतमालाची गुणवत्ता, साठवण, वाहतूक आणि विपणन या सगळ्या गोष्टींमध्ये नव्या तंत्रज्ञानाची आणि सुविधा विकासाची गरज आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन येवला बाजार समिती सातत्याने पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, बाजार समितीच्या सभापती सविता पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक बापूसाहेब गायकवाड यांनी तर, सूत्रसंचालन रतन बोरनारे यांनी केले.
व्यापारी प्रतिनिधींसोबत बैठक
मंत्री भुजबळ यांनी तालुक्यातील व्यापारी प्रतिनिधींची त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत व्यापारी प्रतिनिधींनी त्यांच्याकडे विविध मागण्यांबाबत निवेदन दिले. यावेळी भुजबळ यांनी शेतकरी आणि व्यापारी या दोनही घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आश्वस्त केले. यावेळी रामेश्वर कलंत्री, नंदकिशोर अट्टल, भारत समदडिया आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.