नाशिक : फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा किती असावी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मापदंड ठरवून दिलेले असतानाही, हे सर्व मापदंड पायदळी तुडवत नाशिककरांनी ध्वनी प्रदूषणाचा दणदणाट करीत दिवाळी साजरी केली. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या आदल्याच दिवशी ध्वनीप्रदूषण विक्रमी ९०.१ डेसिबल इतके नोंदविले गेले. तर दिवाळीच्या दिवशी नाशिकच्या हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली असून, एअर क्वॉलिटी इंडेक्स थेट १७४ वर गेल्याची नोंद झाली.
गतवर्षी ७३.३ इतक्या डेसिबल ध्वनीप्रदूषणाची नोंद झाली होती. यंदा मात्र त्यापेक्षाही अधिक ध्वनीप्रदूषणाची नोंद झाल्याने, नाशिकचेही नाव आता प्रदूषित शहरांच्या यादीत जाते की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील विविध भागांमध्ये २० आणि २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ध्वनीप्रदूषणाची नोंद केली. सीबीएस, पंचवटी, दहीपुल, सिडको आणि बिटको पाॅईंट या भागात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाची नोंद केली.
त्यात दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला (दि.२०) सीबीएस परिसरात रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान विक्रमी ९०.१ डेसिबल इतक्या ध्वनीप्रदूषणाची नोंद झाली. पाठोपाठ पंचवटीमध्ये ९०, दहीपुल येथे ८८.५, सिडको ८७.५ आणि बिटको पाॅइंट येथे ८६.७ इतक्या डेसिबलची नोंद झाली. २० आॅक्टोंबर रोजी पहाटे ५ ते ६ वाजेपर्यंत फटाक्यांचा दणदणाट सुरू होता.
२१ ऑक्टोबर रोजी देखील रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यानच ७५ डेसिबल इतक्या ध्वनीप्रदूषणाची नोंद झाली. दोन्ही दिवशी सीबीएस परिसरात सर्वाधिक ध्वनीप्रदूषण केले गेल्याचे नोंद झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाके कमी आवाजाचे फोडावेत असे आवाहन केले होते. मात्र, या आव्हानाला अजिबातच प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे.
ध्वनीप्रदूषणाची अशी आहे मर्यादा
औद्योगिक क्षेत्र - ७५ डेसिबल
व्यावसायिक क्षेत्र ६५ डेसिबल
निवासी क्षेत्र ५५ डेसिबल
शांत क्षेत्र (उदा. रुग्णालय, शाळा, न्यायालय परिसर) - ५० डेसिबल
एक्यूआय १७४ वर
शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकची हवा सातत्याने प्रदूषित होत आहे. लक्ष्मी पूजनाच्या रात्री नाशिकच्या हवेची गुणवत्ता प्रचंड खालावल्याची नोंद झाली होती. एक्यूआय थेट १७४ वर गेला होता. याशिवाय आदल्या दिवशी देखील नाशिकच्या हवेची गुणवत्ता ढासाळली होती. गतवर्षी देखील दिवाळीच्या दिवशी एक्यूआय १७२ इतका होता. यंदा त्यात दोन टक्क्याची भर पडली आहे. दरवर्षी या काळात एक्युआय वाढत असल्याने, नाशिककरांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
२० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर (रात्री ९ ते १० या वेळची नोंद)
स्थळ - डेसिबल
सीबीएस - ९०.१ - ७५.०
पंचवटी - ९०.० - ७५.०
दहीपूल - ८८.५ - ७४.४
सिडको - ८७.५ - ७४.७
बिटको पाॅईंट - ८६.७ - ७४.५