नाशिक : येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा उत्साह प्रचंड वाढला असून, शहरातील सर्व बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्या आहेत. बोनस मिळाल्याने आणि विविध सवलती उपलब्ध असल्याने कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदी तसेच दिवाळीच्या सजावटीच्या वस्तूंसाठी नागरिक मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत. त्यामुळे प्रमुख चौकांमध्ये सोमवारी (दि. २०) वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
लक्ष्मीपूजनासाठी नवीन कपडे खरेदी करण्याची परंपरा असल्याने कपड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. प्रत्येक कपड्याच्या दुकानासमोर ग्राहकांची गर्दी दिसत असून, जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना मिळत असल्याने विक्रेतेदेखील समाधानी आहेत. रविवार कारंजा, शालिमार, दूध बाजार, गोदाघाट, मेन रोड आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जीएसटी दर कमी झाल्याने टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, पंखे, मिक्सर आदी घरगुती वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. याबरोबरच चारचाकी, दुचाकी तसेच तीनचाकी वाहनांच्या खरेदीतही वाढ झाली असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पूजा साहित्याची खरेदी
लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या लक्ष्मीदेवीच्या मूर्ती, केरसुणी, लाह्या, बत्तासे, बोळके, लक्ष्मीची पावले, तोरणे, झेंडूची फुले, मिठाई आदी सामग्री खरेदी करण्यासाठी नागरिकांनी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दी केली होती. तसेच फटाके खरेदीसाठी नाशिककरांची मोठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले.