नाशिक : यंदा सहा दिवसांची दिवाळी साजरी केली गेल्याने, शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. आता सुट्टी संपली असली तरी, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळी फिव्हर कायम असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी (दि. २४) नियमित शासकीय कार्यालये सुरू झाली असली तरी, बहुतांश अधिकाऱ्यांनी दांडी मारत थेट सोमवारीच (दि.२७) रूजू होण्याचे नियोजन केले आहे.
१८ ते २३ ऑक्टोंबरपर्यंत यंदा दिपोत्सव साजरा केला गेला. १८ व १९ ऑक्टोंबर राेजी साप्ताहिक सुट्टी आल्याने, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या खऱ्या अर्थाने सोमवारपासून (दि.२०) सुरू झाल्या. सोमवारी नरक चतुर्दशी २१ रोजी दिपावली, लक्ष्मीपूजन, २२ रोजी दिवाळी पाडवा आणि २३ रोजी असलेल्या भाऊबीजेची सुट्टी आल्याने शासकीय कार्यालये बंद होती.
सलग सहा दिवस सुट्ट्या आल्याने, अनेक अधिकाऱ्यांनी गावी जाणे पसंत केले. काहींनी भटकंतीसाठी प्लॅन करीत, फॅमिली टूर काढला. दरम्यान, गुरुवारी (दि. २३) सुट्टी संपल्याने, शुक्रवारी (दि. २४) अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू होणे अपेक्षित होते. मात्र, शनिवार (दि.२५) आणि रविवार (दि.२६) पुन्हा साप्ताहिक सुट्टी आल्याने अनेकांनी शुक्रवारची रजा टाकून थेट सोमवारीच कामावर रूजू होण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शुक्रवारी बहुतांश अधिकारी भेटले नसल्याने सर्वसामान्यांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.
उद्योग भवन ओस
सहा दिवसांच्या सुट्या असल्याने, उद्योग भवनमधील सर्वच आस्थापना बंद होत्या. त्यामुळे उद्योगांशी निगडीत अनेक कामे रखडली आहेत. उद्योग भवन येथे एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा कार्यालय, अन्न व औषध प्रशासन विभाग, कामगार उपायुक्तालय, जिल्हा उद्योग केंद्र आदी कार्यालये आहेत. शुक्रवारी ही कार्यालये ओस असल्याने, नागरिकांना माघारी फिरावे लागले. आता सोमवारी तरी अधिकाऱ्यांनी कामावर रूजू होवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.