ठळक मुद्दे
घरापासून दूर असलेल्या या नागरिकांना घरच्या फराळाची चव
दिवाळीनिमित्त टपाल विभागातर्फे फराळ पाठविण्याची उत्तम आणि विश्वासार्ह सुविधा उपलब्ध
पोस्ट ऑफिसमार्फत १२० देशांमध्ये फराळ, पार्सल पाठविणे शक्य
नाशिक : लक्ष्मी पवार
भारतीय नागरिक शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक झाले असले, तरी त्यांना आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी सण साजरा करण्याची ओढ असते. घरापासून दूर असलेल्या या नागरिकांना घरच्या फराळाची चव आणि सणाचा आनंद मिळावा, यासाठी दिवाळीनिमित्त टपाल विभागातर्फे फराळ पाठविण्याची उत्तम आणि विश्वासार्ह सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी स्वतंत्र काउंटर पोस्ट ऑफिसमध्ये सुरू केलेले असून, ३५ किलोपर्यंतचा फराळ सहज जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवता येणार आहे. यामध्ये फराळ पॅक करून पाठवण्याचीही सुविधा आहे. यासाठी विकत घेतलेली मिठाई वा फराळाच्या खरेदीचे बिल बंधनकारक आहे. या सेवेमुळे देशात आणि परदेशात असलेल्या आपल्या नातेवाइकांना फराळ पाठविणे अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ झाले आहे. पोस्ट ऑफिसमार्फत १२० देशांमध्ये फराळ, पार्सल पाठविणे शक्य असून, ही सुविधा इतर कोणत्याही नामांकित कुरिअर कंपनीपेक्षा अधिक परवडणारी आहे.
त्याचप्रमाणे, पोस्ट ऑफिसमध्ये न जाता ww.indiapost.gov.in या वेबसाइटच्या माध्यमातून घरबसल्या पार्सल पाठविणे सोयीचे झाले आहे. यात फराळासोबत ग्रीटिंग कार्ड, पिक्चर पोस्ट कार्ड, भेट वस्तू देखील पाठविता येणार आहे. या सुविधेअंतर्गत रिअल टाइम ट्रॅकिंग असल्याने पार्सल कुठे, कधी पोहोचेल हे कळते. सध्या या सेल्फ सर्विस फॅसिलिटीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध आहे. दररोज १० ते १५ आंतरराष्ट्रीय पार्सल आणि देशांतर्गत हजारो पार्सल पाठविले जात आहे.
दिवाळीच्या काळात ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे फुल पार्सलसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून दररोज अनेक आंतरराष्ट्रीय पार्सल पाठवले जात आहेत. ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि कमी दरात सेवा देण्यास आमचे प्राधान्य आहे.आर. बी. रनाळकर, प्रवर डाकपाल सिनिअर पोस्ट मास्टर, नाशिक मुख्य डाकघर
माझा मुलगा शिक्षणासाठी रशियात राहतो. दरवर्षी फराळ पाठवण्यासाठी खासगी कुरिअरचा वापर करावा लागायचा पण आता पोस्ट ऑफिसमधून तोच फराळ कमी दरात आणि सुरक्षित वेळेवर पोहोचतो, त्यांची सेल्फ सर्विस ही सेवा देखील घरबसल्या फराळ पोहोचवण्यासाठी अत्यंत सोयीची आहे.गायत्री कर्पे, ग्राहक