पुढारी विशेष-सतीश डोंगरे, नाशिक
दिवाळीत ऑनलाइन खरेदी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, आर्थिक व्यवहार आणि आकर्षक सवलतींची लगबग सुरू असतानाच नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर होण्याचा धोका वाढला आहे. परिचित व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल, बनावट व्हिडिओ, खोट्या सरकारी अॅप्सची लिंक, आकर्षक नोकरीच्या जाहिराती आणि क्यूआर संकेतांच्या माध्यमातून फसवणूक करण्याच्या पद्धती समोर येत आहेत. गेल्या जुलै महिन्यात समाजमाध्यमांवर १४० अशा पोस्ट व्हायरल केल्या गेल्या, ज्यात कृत्रिम आवाजाच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनांमध्ये 'एआय'च्या मदतीने आवाजाची नक्कल करून पैसे मागणे, बनावट सरकारी अॅप्सच्या माध्यमातून मोबाइलमधील संदेश व गोपनीय माहिती मिळवणे संशयास्पद क्यूआर संकेत आणि खोट्या नोकरीच्या जाहिराती यासारखे प्रकार वाढले आहेत. जुलै २०२६ मध्ये महाराष्ट्र सायबर विभागाने समाज माध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या मजकुरासंदर्भात केलेल्या तपासात ५०० हून अधिक समाजमाध्यम खात्यांची आणि ४२९ आक्षेपार्ह पोस्ट व खात्यांची ओळख पटविली. त्यापैकी १४० हून अधिक पोस्टमध्ये एआय-निर्मित अथवा एआयच्या मदतीने बदललेला मजकूर, कृत्रिम आवाज, आवाजाची नक्कल आणि बदललेल्या व्हिडिओंचा वापर झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे या पोस्टचा वापर फसवणुकीसाठी केला गेल्याचे तपासात समोर आले आहे.
ओळखीचा आवाज ऐकूनही सावध राहा
एआयच्या मदतीने समाज माध्यमांवरील ध्वनिमुद्रणांचा वापर १ करून एखाद्या व्यक्तीच्या आवाजासारखा कृत्रिम आवाज तयार करणे शक्य आहे.
अशा आवाजात नातेवाईक अडचणीत असल्याचे सांगणे, वरिष्ठ 3 अधिकारी किंवा व्यावसायिक भागीदार असल्याचे भासविणे आणि तातडीने पैसे मागणे अशा पद्धतींचा धोका आहे.
त्याचप्रमाणे बनावट व्हिडिओ कॉल किंवा बदललेल्या 3 छायाचित्रांच्या मदतीने विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
दिवाळीच्या काळात भेटवस्तू, सवलती, बक्षिसे, ऑनलाइन ४ खरेदी, नोकरीच्या संधी आणि गुंतवणुकीच्या जाहिरातींकडे नागरिकांचे लक्ष असते.
अशावेळी खातरजमा करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
अनोळखी क्यूआर संकेत तपासल्याशिवाय वापरू नयेत.
व्हॉट्सअॅप किंवा संदेशांद्वारे आलेल्या अनोळखी अॅपच्या फाइल्स ओपन करू नयेत.
बँकेचे ओटीपी, पिन, संकेतशब्द किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.
पैसे मागणारा आवाज परिचित वाटला, तरी त्या व्यक्तीच्या नेहमीच्या क्रमांकावर स्वतंत्रपणे संपर्क साधून खात्री करावी. आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे
हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
व्यवहाराचे संदेश, संबंधित क्रमांक आणि इतर पुरावे जतन करावेत
नागरिकांनी दक्षता घेऊनच व्यवहार करावेत. विशेषतः सणासुदीत कुठल्याही मोहला बळी पडू नये. खातरजमा केल्याशिवाय आर्थिक देवाणघेवाण करू नये. दक्षता पाळावी.पोलिसांची मदत घ्यावी. - सुशीला कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे
पाच वर्षांत सायबर गुन्ह्यांत वाढ
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०२० मध्ये ५,४९६ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२१ मध्ये ५,५६२, २०२२ मध्ये ८,२४९, २०२३ मध्ये ८,१०३, तर २०२४ मध्ये ९,९२२ सायबर गुन्हे नोंदवले गेले. २०२० च्या तुलनेत २०२४ मधील नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्या सुमारे ८० टक्क्यांनी अधिक आहे. २०२५ आणि २०२६ मध्ये यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.