नाशिक : उत्साह, आनंद आणि खरेदीचा हंगाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीत बाजाराला मोठी झळाळी मिळाल्याने, जिल्ह्याचे अर्थचक्र गतीमान झाले आहे. सोने, वाहन, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे, कपडे आणि मिठाईच्या विक्रीत लक्षणीत वाढ झाल्याने, नाशिककरांनी प्रकाशपर्वात तब्बल पाच हजार कोटींच्या खरेदीचा बार उडवून दिल्याचा अंदाज आहे. बाजारातील कोटींच्या कोटी उड्डाणांमुळे बाजारावरील मरगळ दूर झाल्याने व्यापारी, विक्रेता वर्ग सुखावला आहे.
दसऱ्यापासून सुरू झालेला खरेदीचा जोर दिवाळीत वाढतच गेला. शहरातील प्रमुख बाजारपेठेसह उपनगरांमधील बाजारपेठा, मॉल्स आणि ऑनलाइन स्टोअर्स ग्राहकांनी अक्षरश: गजबजून गेले होते. विशेषत: धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली. सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार होत असतानाही, त्याचा खरेदीवर फारसा परिणाम दिसून आला नाही.
सराफ व्यावसायिकांच्या अंदाजानुसार प्रकाशपर्वात सराफ बाजारात एक हजार कोटींच्या आसपास उलाढाल झाली. याशिवाय प्रकाशपर्वाच्या पाच दिवसात वाहन बाजारात ईव्ही वाहनांसह तब्बल ७५० पेक्षा अधिक कार आणि ३५०० दुचाकी विक्री झाल्याचा अंदाज असून, त्यातून देखील एक हजार कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय रियल इस्टेट क्षेत्रात ६५० फ्लॅट विक्रीचा अंदाज असून, या क्षेत्रात देखील हजार कोटींच्या उलाढाल झाल्याबाबतचा तर्क लावला जात आहे.
तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भांडीबाजारातील घरगुती उपकरणे, कपडे, मिठाई, पूजा साहित्य, फटाके, फर्निचरसह अन्य खरोदीतून दोन हजार कोटींच्या आसपास उलाढाल झाल्याचे बोलले जात आहे. या खरेदीमुळे नाशिकच्या अर्थव्यवस्थेला नवचैतन्य लाभले आहे. दिवाळीच्या या खरेदीमुळे शहरातील ग्राहकांची क्रयशक्ती आणि सकारात्मक आर्थिक वातावरण दिसून आले.
'स्वदेशी'चा नारा ठरला प्रभावी
दिवाळीच्या खरेदीत 'स्वदेशी'चा नारा प्रभावी ठरल्याचे विक्रेत्यांची म्हणणे आहे. नाशिककरांनी 'मेड इन इंडिया' वस्तू खरेदीला प्राधान्य दिल्याने, स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळाले आहे. एकूणच, दिवाळीने नाशिकच्या बाजारपेठांना नवसंजीवनी दिली असून या सणानंतरही विक्रीचा उत्साह काही काळ टिकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आकडे बोलतात...
वाहन बाजार - १ हजार कोटी - ७५० कार- ३५०० बाइक
रियल इस्टेट - १ हजार कोटी - ६५० फ्लॅट विक्री
सराफ बाजार - १ हजार कोटी
इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, मिठाई, पूजा साहित्य, फटाके - २ हजार कोटी
सराफ बाजारात चढउतार
प्रकाशपर्वातील पाचही दिवसात सराफ बाजारात चढउतार दिसून आला. प्रकाशपर्वाच्या प्रारंभी म्हणजेच १७ आॅक्टोंबर रोजी २४ कॅरेट सोने दर प्रति तोळा जीएसटीसह १ लाख ३५ हजार १४० रुपयांवर होते. हाच दर भाऊबीजेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि.२३) १ लाख २७ हजार ९३० रुपयांवर आला. चांदीत तर मोठ्या प्रमाणात घसरण झाली. प्रकाशपर्वाच्या प्रारंभी १ लाख ८५ हजार ४०० रुपये प्रतिकिलो होती. भाऊबीजेला चांदीचा दर प्रति किलो १ लाख ७२ हजार १० रुपयांवर आला. सराफ बाजारातील हा चढउतार ग्राहकांच्या खरेदीवर मात्र प्रभावी ठरला नाही. मुहूर्त साधण्याबरोबरच सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील ग्राहकांनी सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले.
बाजारात आणखी आठवडाभर गर्दी
दिपोत्सव संपला असला तरी, बाजारात गर्दी कायम आहे. भाऊबीजेसाठी बहिणी माहेरी आल्या असून, त्या खरेदीसाठी बाहेर पडल्या आहेत. याशिवाय ज्यांना दिवाळीत गर्दीमुळे पुरेशी खरेदी करता आली नाही, ते देखील खरेदीसाठी आता घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे बाजारात आणखी आठवडाभर गर्दी कायम राहण्याचा विक्रेत्यांचा अंदाज आहे. त्यातून देखील मोठी उलाढाल अपेक्षित आहे.