नाशिक

Divisional Commissioner of Nashik | नवे आयुक्त गेडाम यांच्यासमोर आव्हानांची मालिका 

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राज्यातील धाडसी व अभ्यासू अशी ओळख असलेले डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांनी नाशिक विभागाच्या महसूल आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. कडक शिस्तीचे अधिकारी असलेल्या डाॅ. गेडाम यांच्यासमोर विभागातील दुष्काळ, चारा, विधान परिषद निवडणुकीसह विविध आव्हाने असणार आहेत. दरम्यान, गेडाम यांच्या एन्ट्रीमुळे कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे.

जळगाव येथील घरकुल घोटाळा उघडकीस आणणारे डॉ. गेडाम (Dr. Praveen Gedam) यांची प्रशासनातील जायंट किलर अशी ओळख निर्माण झालेली आहे. २००२ च्या भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या गेडाम यांनी आजपर्यंत विविध पदांवर कार्यरत असताना कामामधून वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती असताना कृषी विभागाच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळणाऱ्या गेडाम यांच्याकडे शासनाने नाशिक विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे सोपविली आहेत. मात्र, गेडाम यांच्याकरिता ही जबाबदारी सोपी नसणार आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डाॅ. गेडाम यांना पहिल्या दिवसापासूनच कार्यरत व्हावे लागणार आहे. त्याचवेळी विभागातील पाचही जिल्ह्यांत पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात ३९० टँकर सुरू असून, अन्य चार जिल्ह्यांमध्ये तेवढ्याच प्रमाणात टँकरच्या फेऱ्या होत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या कामकाजासह विभागातील दुष्काळावर मात करण्याचे आव्हान गेडाम यांना पेलावे लागले. त्याचवेळी जनावरांचा चारा व पाण्याच्या नियोजनसंदर्भात लक्ष घालावे लागणार आहे.

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारणासाठी डॉ. गेडाम यांना तयारीवर भर द्यावा लागेल. सप्टेंबर-ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया ही विभागात पाचही जिल्ह्यांत शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी आयुक्त म्हणून गेडाम यांना अधिक लक्ष घालावे लागणार आहे. तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान नूतन आयुक्तांपुढे असणार आहे. एकुणच कामांची लिस्ट बघता, डॉ. गेडाम (Dr. Praveen Gedam) यांना पहिल्या दिवसापासूनच सक्रिय राहावे लागणार आहे.

कुंभमेळ्यात होणार फायदा

डॉ. प्रवीण गेडाम यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्याच कार्यकाळामध्ये शहरात कुंभमेळ्याचे उत्तम नियोजन पार पडले होते. शहरात त्यावेळी रस्त्यांपासून ते साधुग्राम व अन्य मोठी विकासकामे उभी राहिली. त्यामुळेच २०२७ ला होणाऱ्या सिंहस्थाच्या आयोजनात गेडाम यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT