टेंडरचा वाद विकोपाला गेल्याने ठेकेदाराने ठेकेदाराच्या कानशिळात लगावल्याचा प्रकार नाशिक जिल्हा परिषदेत घडला.  file photo
नाशिक

Nashik ZP | टेंडरचा वाद विकोपाला ; दोन ठेकेदारांमध्ये फ्री स्टाईल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : खडीकरण कामासाठी अधिकचे टेंडर भरणाऱ्या मक्तेदाराला प्रतिस्पर्धी ठेकेदाराने कानशिळात लगावल्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग- ३ मध्ये शुक्रवारी (दि. ११) दुपारी दीड वाजता घडला. दोन ठेकेदारांमधील वाद विकोपाला गेल्याने काहीकाळ वातावरण तंग झाले होते. अधिकारी व कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला गेला.

येत्या तीन ते चार दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचायत समिती असो की जिल्हा परिषद सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये निविदा मंजुरीचा धडाका सुरू आहे. त्यातच सा. बां. विभाग क्र. तीनच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी टेंडरवरुन निफाड आणि मनमाड येथील ठेकेदारांमध्ये वाद उद्भवला. ओझर येथील सुमारे ५० लाखांच्या खडीकरण कामासाठी मनमाडच्या ठेकेदाराने अधिकचे टेंडर भरले. याबाबत निफाडच्या ठेकेदाराने जाब विचारला. दोघांमधील वाद विकोपाला जाऊन निफाडच्या ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराच्या श्रीमुखात भडकविल्या. यामुळे सर्वच अवाक झाले. तेव्हा विभागातील अधिकार्‍यांनी दोघांना कार्यालयाच्या बाहेर नेत दोघांमध्ये समझोता घडवून आणला. त्यामुळे वातावरणातील तणाव निवळला.

निविदाप्रक्रिया सुरू असताना ठेकेदारांनी संयम पाळावा. अधिकारी-कर्मचार्‍यांना सहकार्य करावे. शासकीय कार्यालयात सार्वजनिक शांततेला तडा जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कुठल्याही प्रकारे नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
- शैलजा नलावडे, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग - ३, जि. प.

कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही कामकाज

आचारसंहिता लागल्यानंतर निविदाप्रक्रियेला ब्रेक लागेल. तत्पूर्वी अधिकाधिक कामे मंजूर करण्याकडे यंत्रणेचा कल आहे. त्यासाठी ठेकेदार सकाळी ९ वाजेपासूनच जिल्हा परिषदेत गराडा घालतात. सा. बां. १- २- ३ आणि जलसंधारण विभागात १० लाखांच्या आत- बाहेरची कामे मार्गी लावण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी अधिकारी- कर्मचारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही कामाला प्राधान्य देत असल्याने त्यामागील 'अर्थ' चर्चेचा विषय ठरला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT