नाशिक : सलग तीन वेळा भाजपचे आमदार निवडून देऊनही नाशिकला मंत्रिपद मिळू न शकल्यामुळे स्थानिक भाजपत अस्वस्थता पसरली आहे. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना दिलेले मंत्रिपदाचे आश्वासनही पाळले न गेल्यामुळे शहर व जिल्हा भाजपत चलबिचल सुरू झाली असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदारांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नाशिक जिल्ह्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सात आमदारांमधून दिंडोरी मतदारसंघातील आमदार नरहरी झिरवाळ, सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली. शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार असतानाही दादा भुसेंच्या रूपाने शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळाले. नाशिकमध्ये राष्ट्रवादी खालोखाल भाजपचे पाच आमदार आहेत. भाजपला मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे फडणवीस यांनीच विधानसभा निवडणूक प्रचारसभेत चांदवडचे आमदार ॲड. राहुल आहेर यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. नाशिक शहरातही आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे या तिसऱ्यांदा, तर आ. राहुल ढिकले हे दुसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांच्यापैकी किमान एकाला मंत्रिपदावर संधी मिळेल, अशी आशा भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र नाशिकला भाजपने एकही मंत्रिपद दिले नाही. याउलट जळगाव जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असताना या ठिकाणी गिरीश महाजन, संजय सावकारे या दोघांना मंत्रिपद मिळाले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाची शर्यत आता दुरंगी बनली असून, गत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या अनुभवाचे दाखले देत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने गिरीश महाजन यांचे नाव नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी पुढे केले आहे.