नाशिक : कामावर जाताना अर्धांगवायूचा झटका येऊन कायमचे दिव्यंगत्व आलेल्या कामगारास गोंदे एमआयडीसीतील कंपनीने वाऱ्यावर सोडल्याची माहिती समोर आली आहे. दिव्यंगत्वामुळे भविष्य अंधकारमय बनलेल्या या कामगाराला कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक मदत तर सोडाच पण कामावरही घेण्यास नकार दिल्याने कामगाराच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार पत्नीकडून गेल्या पाच वर्षांपासून कामगार आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र न्याय मिळू न शकल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथील एका कंपनीत नाशिकचे मधुकर लोटन भामरे हे १९९५ पासून कामाला होते. कायमस्वरूपी कामगार म्हणून कार्यरत असताना अचानक नियतीने दुर्दैवी आघात केला. २०२० मध्ये सकाळी कंपनीत कामावर जात असताना भामरे यांना मेंदूघात होऊन अर्धांगवायूचा झटका आला. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना उपचारासाठी मोठा खर्च आल्यानंतरही भामरे यांना कायमचे दिव्यंगत्व आले. उपचारासाठी कंपनीने कोणतीही आर्थिक मदत केली नाही.
भामरे यांना जिल्हा रुग्णालय मार्फत तपासणी होऊन बिटको रुग्णालयातुन कायमस्वरूपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. नियमानुसार भामरे यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असताना कंपनीने हात वर करून त्यांना कामावर घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबाचे भविष्य अंधकारमय बनले आहे. भामरे यांच्या अर्धांगिनी हर्षणी भामरे या दिव्यांग पतीस न्याय मिळावा म्हणून आशेने जिल्हा प्रशासन, दिव्यांग प्राधिकरण, कामगार उपायुक्त, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. परंतु पाच वर्षे उलटूनही अद्याप न्याय मिळत नसल्याची खंत भामरे यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे. दिव्यांग आयुक्त यांच्याकडेही तक्रारी केल्या आहेत; परंतु दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी स्थापिलेले दिव्यांग कल्याण आयुक्तालय हेही भामरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी असमर्थ ठरले आहे. दिव्यांग संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्था, यांनीही कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी व अन्यायग्रस्त भामरेंना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत दिव्यांगांनी व्यक्त केले आहे.
कायमस्वरूपी कामगार म्हणून नियमानुसार संबंधित कंपनीने दिव्यांग भामरे यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय मिळत नाही. दिव्यांग संघटना, लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी पुढे येऊन न्याय मिळवून द्यावा.हर्षणी भामरे, दिव्यांग मधुकर भामरे यांच्या पत्नी.