नाशिक : भाजपचे नाराज माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी बुधवारी (दि. २३) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. भाजपने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने, इच्छुक असलेले पाटील नाराज झाले होते. निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याने त्यांनी तडकाफडकी मनसेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे.
'नाशिक पश्चिम' मतदारसंघात विद्यमान आमदार हिरे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून इच्छुकांनी त्यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली होती. शहराध्यक्षांसमोर ठिय्या देत आपल्या भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचविल्या होत्या. मात्र, अशातही हिरे यांना उमेदवारी दिल्याने, इच्छुक सैरभैर झाले होते. तर दिनकर पाटील यांनी मंगळवारी (दि. २२) समर्थकांचा निर्धार मेळावा घेत, निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी बुधवारी मनसेच्या स्थानिक नेत्यांसमवेत मुंबई गाठत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करीत, उमेदवारी निश्चित केली. दरम्यान, पाटील यांनी २०१४ मध्येदेखील काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत बहुजन समाज पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. निवडणुूकीत पराभव झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपकडून इच्छुक होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट दिल्याने, पाटील नाराज झाले होते. त्याचवेळी ते मनसेत प्रवेश करून, लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा रंगली होती. त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली हाेती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या निवासस्थानी भेट देत विधानसभा निवडणुकीत विचार करू, अशा प्रकारचा शब्द दिल्याची त्यावेळी चर्चा रंगली होती. दरम्यान, यावेळीदेखील तिकीट न मिळाल्याने त्यांनी मनसेत प्रवेश करीत, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपली दावेदारी सादर केली आहे.
मनसे स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात असले तरी, आयारामांवर त्यांचे गणित अवलंबून असणार आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात मनसेने यश मिळविले असले तरी, पूर्व, मध्य, देवळालीसह जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघांत त्यांच्या गळाला कोण लागेल? हा प्रश्न आहे. इतर पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होत असतानाच, मनसे नाराजांवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.