ration card verification Pudhari
नाशिक

Ration Card | दिंडोरी तालुक्यात 3 हजार 423 कुटुंबांचा सवलतीचा शिधा बंद; प्राप्तिकर भरणारे लाभार्थी आढळल्याने मोठी कारवाई

Ration Card | पडताळणीत लाभार्थी प्राप्तिकर भरत असल्याचे निष्पन्न

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात रास्त भाव दुकानोंतून सवलतीच्या दरात धान्य घेत असलेल्या २५ हजार १९९ लाभार्थ्यांपैकी तब्बल ३ हजार ४२३ लाभार्थ्यांना शासनाने अपात्र ठरवले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषांनुसार केलेल्या पडताळणीत हे लाभार्थी प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) भरत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा धान्य पुरवठा तातडीने बंद केला आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे शिधापत्रिकाधारकांमध्ये खळबळ उडाली असून, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे.

अशी झाली कारवाई

दिंडोरी तालुक्यात एकूण १७३ रास्त भाव धान्य दुकाने असून, त्याअंतर्गत २५ हजार १९९ शिधापत्रिकाधारक आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आर्थिक व शासकीय माहितीनुसार या सर्व शिधापत्रिकाधारकांची कसून पडताळणी करण्यात आली.

यामध्ये आधार स्टेटस, ड्युप्लिकेट बेनिफिशरी, जीएसटी, तीन ते सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ धान्य न घेणारे, प्राप्तिकर भरणारे, चारचाकी वाहन असणारे तसेच वयाची शंभर वर्षे ओलांडलेले शिधापत्रिकाधारक अशा विविध निकषांच्या आधारे ही छाननी झाली. यामध्ये ३ हजार ४२३ लाभार्थी प्राप्तिकर भरत असल्याचे उघड झाल्याने नियमानुसार त्यांचा धान्य पुरवठा खंडित केला आहे.

ऑक्टोबर महिन्यात नेहमीप्रमाणे धान्य घेण्यासाठी गेलेल्या अनेक कुटुंबांना सवलत धान्य दुकानदारांनी तुमचे धान्य बंद झाल्याचे सांगितले. मशीनवर धान्याची नोंद दिसत नसल्याने नागरिकांनी त्याचे कारण विचारले, तेव्हा जे नागरिक प्राप्तिकर भरतात किंवा ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत, त्यांचे धान्य शासनाच्या आदेशानुसार बंद केल्याचे दुकानदारांनी स्पष्ट केले.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी थेट तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधून चौकशी केली. त्यावेळी पुरवठा अधिकाऱ्यांनी ज्या कुटुंबामध्ये प्राप्तिकर भरणारे सदस्य आहेत, केवळ त्यांचे धान्य बंद झाले असून, इतर पात्र सुविधा पूर्ववत सुरू राहणार आहेत.

तसेच जर एखादा गरजू लाभार्थी प्राप्तिकर भरत नसतानाही तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरला असेल, तर अशा नागरिकांनी आपले आधारकार्ड अपडेट करणे किंवा उत्पन्नाचा खरा पुरावा सादर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले.

तालुक्यातील २५ हजार १९९ लाभार्थ्यांची शासनस्तरावरून डिजिटल पडताळणी केली आहे. जर खरोखरच गरजू असलेले लाभार्थी प्राप्तिकर भरत नसतील तरीही ते अपात्र ठरले असतील, तर त्यांनी तातडीने आधारकार्ड अपडेट करून घ्यावे किंवा गरजेनुसार उत्पन्नाचा वैध पुरावा पुरवठा विभागात सादर करावा. त्यांच्या अर्जाची फेरपडताळणी करता येईल.
— अक्षय लोहरकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT