दिंडोरी (नाशिक) : तालुक्यात अतीवृष्टीच्या पावसाने भात, टोमॅटो व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत तालुक्यात 146 गावांमध्ये दोन हजार 810 शेतकऱ्यांचे अंदाजे तीन हजार 364 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात गत शनिवार (दि.27) आणि रविवारी (दि.29) अतिवृष्टी झाली. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच दिंडोरी तालुक्यातील सहाही धरणे 100 टक्के भरल्याने धरणांतून विसर्ग केला जात आहे. खडक सुकेणे गावात द्राक्ष तसेच इतर पिकांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जानोरी येथील प्रवीण बोस यांच्या टोमॅटो शेतात पाणी साचल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी केली आहे त्यामुळे द्राक्षाचे कोम फुटतील का ? या विवेचनात शेतकरी आहेत.
टोमॅटाे पिकाचे मोठे नुकसान
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार भात 730 हेक्टर, मका 21 हेक्टर, वरी 180 हेक्टर, भुईमूग 410 हेक्टर , टोमॅटो 595 हेक्टर, द्राक्षे 42 हेक्टर, तसेच इतर भाजीपाला 816 हेक्टर याप्रमाणे सुमारे तीन हजार ३६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात अवकाळी पावसाने 146 गावांमध्ये 2810 शेतकऱ्यांचे एकूण अंदाजे 3364 हेक्टर क्षेत्राचे दि. 28 सप्टेंबर पर्यंत नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून आपल्या पिकांची ई-पीक पाहणी करून पंचनामा करून घ्यावे.नानासाहेब भोये, तालुका कृषी अधिकारी
अवकळी पावसाने माझ्या एक एकर टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कमीत कमी दीड ते दोन लाख रुपयांचा फटका बसला आहे. तरी शासनाने आमच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून जास्तीत जास्त भरपाई द्यावी.प्रवीण बोस, शेतकरी, जानोरी