नाशिक : दिंडोरी तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्नेहसंमेलनाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली आणि या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरे गावचे रहिवासी सुनील दरगुडे आणि त्यांचे कुटुंबीय एका खासगी क्लासचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून आनंदाने घरी परतत होते. मात्र, वाटेत अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याशेजारील खोल विहिरीत कोसळले. विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने आतील कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
या अपघातात सुनील दरगुडे यांच्या कुटुंबातील आणि जवळच्या नातेवाईकांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अनर्थ घडला असावा. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात अत्यंत भीषण होता. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत होणे चटका लावून जाणारे आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले, मात्र दुर्दैवाने कोणाचेही प्राण वाचवता आले नाहीत. सध्या दिंडोरी पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत असून, मृतांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.