Digital Arrest : ऑनलाइनद्वारे सात कोटींचा गंडा, तक्रारीसाठी पीडित येईना Pudhari File Photo
नाशिक

Digital Arrest : ऑनलाइनद्वारे सात कोटींचा गंडा, तक्रारीसाठी पीडित येईना

डिजिटल अरेस्टच्या घटनेची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर करण्याची धमकी देत 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली दोन नागरिकांची सुमारे सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणांपैकी फक्त एका घटनेत संबंधित व्यक्तीने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दुसऱ्या प्रकरणात सहा कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक होऊनही संबंधित व्यक्तीकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यास पुढे आलेली नाही.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात लालसरे दाम्पत्य राहात असून, त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात आहे. ७४ वर्षीय अनिल लालसरे आणि त्यांची पत्नी संध्या हे दोघेच घरी राहतात. अनिल लालसरे यांना वृद्धापकाळामुळे विविध आजारांनी ग्रासलेले असून, त्यांच्या पत्नीला दोन-अडीच वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने त्या अंथरुणाला खिळल्या आहेत. त्यांच्यासाठी २४ तास ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा घरातच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

या परिस्थितीचा फायदा घेत, अनिल लालसरे यांना फोनवरून संपर्क साधून, “तुमच्या आधारकार्डाच्या आधारे क्रेडिट कार्ड काढण्यात आले आहे आणि त्याचा गैरवापर झाल्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे. तुम्हाला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर केले जाईल. यासाठी ७२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जर ही रक्कम भरली नाही, तर सीबीआयचे पथक तुम्हाला अटक करून दिल्लीला घेऊन जाईल,” अशा आशयाचा धमकीवजा कॉल आला होता.

या धमकीने घाबरून गेलेल्या अनिल लालसरे यांनी, स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता, बँकेत जाऊन आरटीजीएसद्वारे आरोपींनी सांगितलेल्या खात्यात तब्बल ७२ लाख रुपये भरले. या घटनेला महिना उलटून गेल्यानंतर, त्यांच्या नातेवाइकांनी त्यांची भेट घेतली असता, त्यांनी केलेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती दिली. यानंतर फसवणुकीचा उलगडा झाला. याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असतानाच आणखी एकाची सुमारे ६ कोटी २३ लाख रुपयांची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याची माहिती समोर आली. मात्र, संबंधित व्यक्ती अद्यापही तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT