धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या रावेर शिवारातील नंदाभवानी मंदिर परिसर पर्यटन व तिर्थस्थळ विकासाच्या कामाला मिळालेली स्थगिती उठविण्यात आली आहे. या कामावरील स्थगिती उठविण्यात यावी म्हणून आ.पाटील यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. नंदाभवानी मंदिर परिसर विकास कामासाठी एकूण 4 कोटी 90 लक्ष रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान कापडणे येथील जोगाई माता मंदिर परिसर विकास कामावरीलही स्थगिती आ.पाटील यांच्या प्रयत्नाने उठविण्यात आली आहे. या कामासाठी एकूण 27 लक्ष 53 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
संबधित बातम्या :
धुळे तालुक्यातील नंदाभवानी हे जागृत देवस्थान असून धुळे जिल्हयासह खान्देशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. वनक्षेत्रात असल्यामुळे तिर्थक्षेत्राबरोबर पर्यटनस्थळ म्हणून नंदाभवानी देवस्थान परिसराचा विकास व्हावा म्हणून आ.कुणाल पाटील यांनी राज्याच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन वेळोवेळी आवाज उठविला होता.तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2021 ला याबाबतचा प्रश्न मांडला होता. दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची नंदाभवानीच्या देवस्थान परिसराचा विकासासाठी निधी मिळावा म्हणून भेट घेतली होती. यावेळी तत्कालीन पर्यटन मंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. आ.कुणाल पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर सन 2021मध्ये या कामास मंजुरी मिळाली होती. यासाठी एकूण 4 कोटी 90 लक्ष रुपये मंजुर करण्यात आले होते. दरम्यान भाजपा-शिंदे सरकार आल्यानंतर सदर कामांना स्थगिती देण्यात आली होती. या कामांची स्थगिती उठविण्यात यावी म्हणून आ.कुणाल पाटील यांनी विद्यमान सरकारकडे पाठपुरावा करुन स्थगिती उठविली आहे. त्यामुळे नंदाभवानी मंदिर परिसर विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या कामांचा समावेश-
नंदाभवानी परिसर विकासासाठी मंजुर करण्यात आलेल्या 4 कोटी 90 रु. निधीतून मुख्य प्रवेशव्दार, भक्तनिवास, प्रसादालय, सभामंडप,बगीचा व परिसर सुशोभिकरण, लहान मुलांसाठी खेळण्याची साधने,विद्युतीकरण, पाणी पुरवठ्याची सोय, वाहनतळ,स्वच्छतालय आदी कामे करुन भाविकांची सोयी सुविधा व विकास केला जाणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.
जोगाई माता मंदिर कापडणे-
धुळे तालुक्यातील कापडणे येथील जागाई माता मंदिर परिसर विकास कामासाठीही आ.कुणाल पाटील यांनी एकू 27 लक्ष 53 हजार रुपयांचा निधी मंजुर केला होता. कापडणे ग्रामस्थ व परिसरातील नागरीकांचे श्रध्दास्थान असलेले जोगाई माता मंदिर परिसर विकास कामाचीही स्थगिती आ.पाटील यांच्या प्रयत्नाने उठविण्यात आली आहे. त्यामुळे आता या कामालाही गती मिळणार आहे.
हेही वाचा :