FILE
नाशिक

Devyani Farande | दिग्गजांच्या माघारीचा आ. देवयानी फरांदेंना होणार फायदा

Nashik, Maharashtra Assembly Polls | भाजप समर्थकांचा दावा : उमेदवारीला मिळाली बळकटी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार यांच्या माघारीमुळे भाजपच्या देवयानी फरांदे यांना फायदा होणार असून, फरांदे यांच्या विजयाला यामुळे हातभार लागणार असल्याचा दावा भाजप समर्थकांनी केला आहे.

नाशिक मध्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवार डॉ. हेमलता पाटील या निवडणूक लढतील आणि त्यांना मराठा आणि मुस्लीम समाजाची मते मिळतील, असा कयास लावला जात होता. या समीकरणामुळे आघाडीचाच फायदा होईल, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात डॉ. पाटील यांची उमेदवारी आ. फरांदे यांनाच डोकेदुखी ठरली असती. मराठा समाजाच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी प्रा. फरांदे यांनी शासनाकडून १५९ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. शहरातील त्र्यंबक रोड परिसरात तब्बल दहा मजली साकारणारे हे वसतिगृह गोरगरीब मराठा समाजासाठी वरदान ठरणार आहे. या कामाचे भूमिपूजनही नुकतेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वसतिगृहाच्या कामामुळे मराठा समाज हा आ. फरांदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. डॉ. पाटील यांनी उमेदवारी केली असती तर, मराठा समाजाच्या मतांचे धृवीकरण होऊन त्याचा फटका फरांदे यांना बसू शकला असता. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या माघारीनंतरही मराठा समाजाच्या मतांचे धृवीकरण थांबले आहे. शिवाय अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीतील महत्त्वाचा पक्ष आहे. रंजन ठाकरे यांनी उमेदवारी केली असती तर महायुतीच्याच मतांचे विभाजन होऊ शकले असते. ठाकरे यांच्या माघारीमुळे फरांदे यांच्यावरील हे संकट टळले आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अंकुश पवार यांनीही सोमवारी माघार घेतली. काही महिन्यांपासून भाजप आणि मनसे एकाच भूमिकेतून राजकीय पटलावर कामकाज करीत आहेत. प्रखर हिंदुत्वाच्या मुद्यासाठी काम करणारे हे दोन्ही पक्ष निवडणुकीत आमने सामने आले असते तर हिंदू मतांच्या विभाजनाचा फटका भाजपला बसला असता. शिवाय अंकुश पवार यांचा जुने नाशिक परिसरात बर्‍यापैकी प्रभाव आहे. आता तेच निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने संबंधित मते भाजपच्या पारड्यात पडू शकतात. यामुळे भाजपच्या आ. फरांदे यांच्या उमेदवारीला बळ मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT