संत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो दिंड्या दाखल. छाया - हेमंत घोरपडे
नाशिक

'भेटी लागी जीवा, लागिलीसे आस' ; लाखो भाविक त्र्यंबकनगरीत दाखल

Sant Nivrutinath Maharaj Yotrotsav | आज संत निवृत्तिनाथ यात्रा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : संत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो दिंड्या दाखल होत आहेत. 'भेटी लागी जीवा, लागिलीसे आस' या भावमय उक्तीप्रमाणे लाखो वारकरी हरिनामाचा गजर करत यात्रेसाठी त्र्यंबकेश्वरला पोहोचत आहेत. यंदा सुमारे तीन लाख वारकरी त्र्यंबकराजासह संत निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देतील, असा अंदाज आहे. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तिनाथ महाराज मंदिर देवस्थान आकर्षक रोषणाई व विशेष व्यवस्थांद्वारे सज्ज झाले आहे.

शेकडो वर्षांपासून पौष महिन्यातील एकदशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेची त्र्यंबकेश्वर येथे परंपरा आहे. यानिमित्ताने दिंड्यांसह लाखो वारकरी हरिनामाचा गरज करत नाशिक, जव्हारमार्गे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. यात्रा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने संबंध कुंभनगरी भगवीमय झाली आहे. श्रीफळ देऊन दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

गत दोन दिवसांपासून त्र्यंबककडे जाणार्‍या रस्त्यांवर हरिभक्तांचा मेळावा भरला असून लाखो वारकारी हातात भगवा, पालखी अन मुखात हरिनामाचा गरज करीत त्र्यंबककडे मार्गस्थ होत आहेत. मंदिरांच्या परिसरात रिंगण, फुगड्या खेळताना महिला वारकरी दिसत आहेत.

वारकर्‍यांच्या सोयीसाठी संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात कृत्रिम सभा मंडप, कृत्रिम दर्शन बारीची उभारणी करण्यात आली आहे. यंदाची वारी निर्मल वारी होण्याच्यादृष्टीनेही प्रशासनाकडून तयारी झाली आहे. सध्या महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या प्रसाद योजनेंतर्गत मंदिर परिसरात कामे सुरू आहेत. वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये, म्हणून देवस्थानच्यावतीने सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. मंदिर परिसरात गालीचा टाकण्यात आला आहे. उत्सवकाळात गर्दीवर नियंत्रणासाठी दुभाजकांद्वारे मंदिर परिसर बंदिस्त केला आहे. मानाच्या दिंड्यांसाठी राहुट्यांची व्यवस्था आहे.

लाखो वारकरी आज घेणार संत निवृत्तीनाथांचे दर्शन

पौष महिन्यातील एकादशीला संत निवृत्तीनाथांची यात्रा असते. आज लाखो वारकारी निवृत्तिनाथांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. पुढील तीन दिवस त्र्यंबकेश्वरमध्ये वारकर्‍यांची वर्दळ राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT