साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगड येथे चैत्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या यात्रेदरम्यान दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कडाक्याचे ऊन किंवा गर्दीमुळे आलेल्या अस्वस्थतेतून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
Devotee Death at Saptashrungi Gad yatra in nashik
कळवण : सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात यात्रा सुरू असताना चक्कर येऊन एका भाविकाचा मृत्यू झाला. नंदुरबार येथील एका भाविकाचा गिरणा नदी पात्रात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, अवघ्या काही तासांत हा प्रकार घडला.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगाव येथील परेश धर्मा पवार हे पालखी सोबत पायी सप्तशृंगगडावर दर्शनासाठी जात होते. दरम्यान, कळवण तालुक्यातील भेंडी गावाजवळ भंडारा कार्यक्रम सुरू असल्याने ते महाप्रसाद घेण्यासाठी रांगेत उभे होते. याच वेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल आर. पी. गवळी करीत आहेत.
या घटनेमुळे चौगाव (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यात्रेदरम्यान भाविकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशीही प्रशासनाकडून सूचना करण्यात येत आहे.