Nashik Devlali youth murder  
नाशिक

Nashik Devlali youth murder | देवळालीत जुन्या वादातून युवकाचा खून

देवळालीत जुन्या वादातून युवकाचा खून

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील देवळाली गावात जुन्या वादातून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना घडली आहे. विशाल सीताराम माळवे (३६, रा. सुवर्ण हौसिंग सोसायटी, खोले मळा) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जूनच्या रात्री देवळाली गावातील चुनावाडा, तेली गल्ली परिसरात ही घटना घडली. विशाल माळवे, अमोल गायकवाड व अन्य एक मित्र रात्री एकत्र बसले असताना जुन्या वादातून त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संशयित अमोल गायकवाड याने धारदार शस्त्राने विशालवर हल्ला केल्याचा आरोप आहे. यात डोक्यावर, मानेवर व शरीरावर गंभीर जखमा झाल्याने विशालचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत विशाल यास रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संशयित गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ

नाशिकरोड परिसरात मारामारी, फायरिंग व खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील काही दिवसांत वॉस्को चौकात कोयत्याने हल्ला, जयभवानी रोड परिसरातील फायरिंग, जेवण उशिरा दिल्याच्या कारणावरून दुकानदारावर हल्ला, तसेच खंडणीच्या धमक्या अशा घटना समोर आल्या आहेत. तपोवन परिसरात महिलेचा मृतदेह आढळणे या घटनांनंतर आता आणखी एका खुनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वादाचे कारण १२ वर्षांपूर्वीचे

मृत विशाल माळवे हा पूर्वी सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय होता. सुमारे १२ वर्षांपूर्वी सार्वजनिक उत्सवातील वर्गणीच्या वादातून अमोल गायकवाड व अन्य काही जणांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी विशालने मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात विशाल व अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पुढे सर्वांमध्ये समझोता होऊन ते पुन्हा मित्राप्रमाणे राहत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT