देवळाली कॅम्प (नाशिक) : राज्यातील सातही कटक मंडळांना महापालिका किंवा नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली साधारण चार वर्षांपासून सुरू होत्या. देवळाली कटक मंडळाच्या समावेशाला महापालिकेने नकार दिला, तर भगूर नगर परिषदेची लोकसंख्या कमी असल्याने आमदार सरोज आहिरे यांनी स्वतंत्र नगर परिषदेची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला तत्त्वत: मान्यता देत तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले. त्यामुळे देवळालीच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
राज्यातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्यासह लोकप्रतिनिधींची बैठक गुरुवारी (दि. 10) मंत्रालयात झाली. देवळाली नगर परिषद घोषित झाल्यानंतर मूलभूत सुविधांसाठी निधीची आवश्यकता असून, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेजची मागणी केल्याचे आमदार आहिरे यांनी सांगितले.
देवळाली कॅम्पला मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून स्वतंत्र नगर परिषद दर्जासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. नाशिक महापालिकेने समावेशास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगर परिषद स्थापनेस मंजुरी दिली. पुढील तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होणार असून, देवळालीला जिल्हा नियोजन मंडळाचा निधीही मिळणार असल्याचे आ. आहिरे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने कॅन्टोन्मेंट बोर्डाबाबत घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शासनाने तातडीने निवडणूक प्रक्रिया राबवावी व लोकप्रतिनिधींची सत्ता पालिकेत स्थापन करावी.रतन चावला, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सिंधी सेल
कॅन्टोन्मेंट बोर्डऐवजी नगर परिषद होणार असल्याने नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.बबन कांडेकर, विभागप्रमुख, शिवसेना (उबाठा)
शासनाने नोकरशाहीच्या हातातून चार वर्षांनी लोकप्रतिनिधींच्या हातात सत्ता देण्यासाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह असून, हा लोकशाहीचा विजय आहे.सोमनाथ खातळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व मिळणार असून त्यातून विकासाला खर्या अर्थाने चालना मिळेल.सुरेश कदम, अध्यक्ष, गवळीवाडा मित्रमंडळ
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. नियोजित कॅम्प नगर परिषदेमध्ये 15 ते 16 नगरसेविका असतील.प्रभावती धिवरे, माजी उपाध्यक्ष
पूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डात आठ नगरसेवक होते, आता ही संख्या 30 च्या दरम्यान राहणार असून, सर्व समाजाला प्रतिनिधित्व मिळेल.डॉ. संतोष कटारे, प्रदेश सरचिटणीस, रिपाइं
पूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डात अल्पसंख्याकांना क्वचितच प्रतिनिधी मिळायचे, परंतु नगर परिषदेमध्ये अल्पसंख्याक समाजाला निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास आहे.अजिज शेख, शहराध्यक्ष, काँग्रेस
देशभरात स्वच्छता आणि आरोग्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवळाली कॅम्प शहराच्या विकासासाठी सक्षम आणि योग्य प्रतिनिधींची निवड होणे अत्यंत आवश्यक आहे.संदीप चौधरी, शहराध्यक्ष, मनसे
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेत विलीनीकरण न करता स्वतंत्र नगर परिषद स्थापन झाल्यास सर्व समाजघटकांना न्याय मिळून शहर विकासासाठी शासन निधी मिळणार आहे.नीलेश बंगाली, शहराध्यक्ष, युवा मोर्चा