Devendra Fadnavis Pudhari
नाशिक

ठाकरेंना लपूनछपून भेटण्याची गरज नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना नोटीस बजावणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : उद्धव ठाकरे आणि आमच्यात कुठलीच भेट लपूनछपून होऊ शकत नाही, ती उघडपणे होऊ शकते. त्यांच्यात अन् माझ्यात असे कुठलेच विषय नाहीत, जे आता लपवायची आवश्यकता आहे. त्यामुळे आमच्यात कुठलीच भेट झालेली नाही, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या देतात, अशा खोटारड्या हँडल्सवर नोटीस बजावली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी (दि. २५) त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी मध्यरात्री झालेल्या भेटीच्या वृत्ताचे खंडन केले. तसेच बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या चार मुले जन्माला घाला अन् त्यातील एक मुलगा संघासाठी स्वयंसेवक म्हणून द्या यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, साधू, संत त्यांची मते मांडत असतात. त्याला आपण व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू सनातन संस्कृतीला जिवंत ठेवत नवचैतन्य दिले आहे. त्यामुळे आपल्या घरातील एक मुलगा त्या ठिकाणी असावा, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना म्हणायचे होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री आमदार गायकवाड यांना समज देतील

एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. त्या समजून न घेता आपण जेव्हा आकांडतांडव करतो, ते योग्य नसते. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकाच्या मनात आदर आहे. हे पुस्तक छापून ४० वर्षे झाली आहेत. ४० वर्षांनंतर अशा प्रकारे मुद्दा उपस्थित करणे हे कितपत योग्य आहे, याचा विचार करायला हवा. शिवराळ भाषा वापरणे अजिबात योग्य नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार संजय गायकवाड यांना समज देतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सिंहस्थ विकासकामांना गती देऊ

सिंहस्थ कुंभमेळ्यांची कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. त्याला गती देण्याची गरज आहे. पुढच्या काळात साधू-महंतांसोबत बैठक घेतली जाईल. कामे समाधानकारक असली, तरी त्याला गती देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला मंत्री भुजबळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्र्यंबकेश्वर येथील समस्त पंचायती आखाडा, नया उदासीन आखाडा येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेदाम यांनी स्वागत केले. यावेळी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, आमदार हिरामण खोसकर, गोपीचंद पडळकर, दिलीप बनकर, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महाराष्ट्र पंचायती आखाडा निरंजनी स्वामी सोमेश्वरनंद सरस्वती महाराज, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी डॉ. एस. पवनदत्त, अपर पोलिस अधीक्षक तेधबीरीसिंग सिंधू, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT