नाथाभाऊंच्या पुनर्प्रवेशाचा वारू देवाभाऊंनी रोखल्याच्या चर्चांना खानदेशात उधाण आले आहे.  file photo
नाशिक

देवाभाऊंनी अडवला नाथाभाऊंचा वारू !

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : मिलिंद सजगुरे

महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र पर्वारंभ झाल्यापासून अडगळीत पडलेले जळगावमधील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांची घरवापसी अशक्यप्राय वाटू लागल्याने ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. वस्तुत:, भाजप पुनर्प्रवेशासाठी दिल्लीश्वरांच्या होकाराचे शिक्कामोर्तब होऊनही राज्यातील कारभाऱ्यांना खडसे पक्षात नको असल्याने घोडे अडले आहे. भविष्यात, कमळावर स्वार हाेण्याच्या आशा मावळल्याने नाथाभाऊ पुनश्च राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पालखीचे भोई होतात की, वेगळी राजकीय वहिवाट शोधतात, याबाबत दोन दिवसांत निर्णय होणे अपेक्षित आहे. थोडक्यात, नाथाभाऊंच्या पुनर्प्रवेशाचा वारू देवाभाऊंनी रोखल्याच्या चर्चांना खानदेशात उधाण आले आहे.

राज्यातील नेतृत्वाकडून सातत्याने अव्हेरल्याची भावना झाल्यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले होते. देवेंद्र फडणवीस- गिरीश महाजन जोडगोळीवर गंभीर आरोप करीत त्यांनी साग्रसंगीत राष्ट्रवादीमय होण्याचे सोपस्कार पार पाडले. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना पवारांनी विधान परिषदेवर घेण्याचे औदार्य दाखवले, तर कन्या रोहिणी यांनाही पक्षाचे प्रदेश महिला अध्यक्षपद बहाल केले. पक्षफुटी प्रक्रियेत दादांसोबत न जाता, खडसेंनी शरद पवारांशी निष्ठा ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात भाजपने लोकसभेसाठी तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांना रावेरमधून मैदानात उतरवून नाथाभाऊंची राजकीय कोंडी करण्याची खेळी खेळली. याच काळात दिल्लीश्वर भाजप नेतृत्वाच्या गळ्यातील ताईत बनलेल्या विनोद तावडे यांनी नाथाभाऊंची वकिली करीत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमवेत भेट घडवली. परिणामी, खडसे यांचा भाजप प्रवेश दृष्टिपथात आला होता.

मात्र, खडसेंनी पक्षात पुन्हा कार्यप्रवण होणे फडणवीस- महाजन यांना पसंत नसल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही नेत्यांनी या मुद्द्याला माध्यमांशी बोलताना सातत्याने बगल दिली. यातूनच शाह- नड्डांना मान्य असलेला खडसेंचा पुनर्प्रवेश फडणवीस- महाजन यांच्या रेड सिग्नलमुळे अव्हेरला गेला. प्रदेश स्तरावर पक्षाची अवघी सूत्रे हातात असलेल्या फडणवीस यांच्या लेखी खडसेंच्या प्रवेशाने पक्षाला कोणताही लाभ होणार नसल्याने एक ज्येष्ठ नेता स्पर्धेत आणणे त्यांनी टाळल्याची चर्चा आहे. फडणवीस- महाजन यांची मनधरणी करण्यापेक्षा इतर राजकीय पर्याय केव्हाही बरे असा विचार मनाला शिवल्यानेच आता खडसे वेगळ्या निर्णयाप्रत आले आहेत. दोन दिवसांत आपली भूमिका ठरवताना, त्याकडे ते राजकीय रोडमॅप म्हणून पाहणार असल्याने त्यांच्या निर्णयाला महत्त्व असणार आहे. स्वाभाविकच त्यांच्या निर्णयाकडे उत्तर महाराष्ट्रीयांचे लक्ष लागून राहणार आहे.

आधी भुजबळ, आता नाथाभाऊ...

महाराष्ट्र प्रदेश भाजप आणि देवेंद्र फडणवीस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखादा निर्णय पक्षाच्या दिल्ली दरबारी मान्य असूनही फडणवीस यांनी व्हेटो वापरला, तर अगदी मोदी- शाह देखील त्यांच्या निर्णयाविरोधात जाण्याची छाती करीत नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधून उमेदवारी करण्याचे फर्मान दस्तुरखुद्द अमित शाह यांनी काढले होते. तथापि, मराठा आरक्षण मुद्दा तापलेला असताना आणि भुजबळ यांनी मनोज जरांगेंशी पंगा घेतल्याने रिव्हर्स इफेक्ट येण्याची शक्यता होती. या मुद्द्यावर फडणवीस यांनी भुजबळ यांची उमेदवारी नाकारण्याबाबत श्रेष्ठींचे मतपरिवर्तन केले. आताही पक्षाध्यक्ष नड्डांच्या उपस्थितीत औपचारिक प्रवेश होऊनही एकनाथ खडसे यांचा वारू फडणवीस यांनी रोखल्याचे सांगण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT