नाशिक : महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला महसूल व वन विभागाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण 62 अधिकार्यांना नायब तहसीलदार (राजपत्रित, गट-ब) पदावर पदोन्नती जाहीर केली आहे. यापैकी नाशिक विभागात मंडळ अधिकारी संवर्गातील 21 कर्मचार्यांना नायब तहसिलदार पदावन नियमित पदोन्नती देण्यात आली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार ही पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय सेवेत कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ही प्रक्रिया 2024-25 या निवडसूची वर्षासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने पूर्ण झाली असून, खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात सहायक महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संवर्गातील 41 कर्मचार्यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यापैकी काहींना नियमित पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर, तर काहींना सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती देतांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, महसूलदिनाच्या निमित्ताने ही पदोन्नती दिल्याने या अधिकार्यांच्या नव्या जबाबदार्या प्रशासनाला अधिक सक्षम करतील आणि जनतेच्या सेवेत त्यांचे योगदान मोलाचे ठरेल. त्यांनी नवपदोन्नती अधिकार्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी प्रोत्साहन दिले. या पदोन्नत्यांमुळे महसूल विभागातील मनुष्यबळाची गरज पूर्ण होण्यास मदत होणार असून, प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम बनणार आहे. या निर्णयामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.