नाशिक : सन 2024-25 साठी मुद्रांक शुल्क विभाग नाशिकने स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून 1545.97 कोटींची वसुली करीत मागील वर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी आघाडी घेतली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुद्रांक शुल्क विभागाला 1750 कोटींचा इष्टांक देण्यात आला होता. इष्टांकापैकी 88 टक्के वसुली करण्यात विभागाला यश आल्याची माहिती मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
मुद्रांक शुल्क वसुली विभाग (स्टॅम्प ड्युटी कलेक्शन डिपार्टमेंट) हा विभाग राज्य सरकारच्या महसुल व वनविभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. जिल्हास्तरावर विविध प्रकारच्या दस्तनोंदणीवर या विभागातर्फे मुद्रांक शुल्क कराची आकारणी केली जाते. साधारणत: विक्री खत (सेलडीड), भाडेकरार (लीव्ह अॅण्ड लायसन्स अॅग्रीमेंट), गहाणखत, दत्तक पत्र, पावती, करारनामे, शेअर ट्रान्सफर, पार्टनरशिप डीडस आदी कागदपत्रांवर मुद्रांक शुल्क आकारणी केली जाते.
सन 2024-25 या आर्थिक वर्षात एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या अकरा महिन्यात एकूण 1 लाख 37 हजार 244 दस्तांची नोंदणी केली गेली. या नोेंदणीतून जिल्ह्याला 1331.65 कोटींचा मुद्रांक शुल्क तर एकट्या मार्च 2025 मध्ये 14 हजार 15 दस्तांची नोंदणी झाल्याने 214.32 कोटींचा महसुल प्राप्त झाला. याप्रमाणे मार्च 2024 मार्च 2025 या 12 महिन्यात 1 लाख 51 हजार 250 दस्तांची नोंदणी झाल्याने सुमारे 1545.97 कोटींचा महसुल प्राप्त झाला आहे.
मुंबई पुण्याचे नागरिक नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यात आघाडीवर असल्याने नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दस्तनोंदणी होते. परिणामी नाशिक विभाग राज्यात मुद्रांक शुल्क वसुलीत आघाडीवर आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्यादृष्टीने देखील मुद्रांक शुल्क महसुल वसुलीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सरकारकडून नाशिक मुद्रांक शुल्क विभागाला 1750 कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. इतर जिल्ह्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कस लागत असताना नाशिक विभागाच्या तिजोरीत मार्च अखेर 1545.97 कोटींचा महसूल जमा झाला आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1050 कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना नाशिक जिल्ह्याने 1518.26 कोटींची मुद्रांक नोंदणी कर वसुली करीत 144.60 टक्के उद्दिष्ट गाठले होते. नाशिककडून मोठ्या प्रमाणावर वसुली होत असल्याचे शासनाकडून नाशिक विभागाला सन 2023-24 साठी 1750 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले. तुलनेत नाशिक जिल्ह्याने 1484.67 कोटींची वसुली करीत 84.84 टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठले. यंदा 2024-25 मध्येही नाशिकला 1750 एवढेच उद्दिष्ट देण्यात आले. मात्र मुद्रांक शुल्क विभागाने कसुन वसुली करताना 1545.97 कोटींचे उद्दिष्ट गाठले. हे उद्दिष्ट मागील वर्षीच्या तुलनेत 4 ट़क्क्यांनी अधिक आहे. सन 2022-23 च्या तुलनेत सन 2023-24 आणि 2024-25 साठी एकदम 750 कोटींचे उदिष्ट वाढवून देण्यात आले असले तरी नाशिक मुद्रांक शुल्क विभागाने 500 कोटींची अधिक वसुली करीत शासनाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे.