देवळाली कॅम्प (नाशिक) : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रस्ते पाणी आरोग्य या समस्या सातत्याने भेडसावत असून रात्री महिलांना पाण्यासाठी उठावे लागते. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून 75 कोटींची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली असून, लवकरच कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सरोज आहिरे यांनी दिली.
देवळाली कॅन्टोन्मेंट वॉर्ड चार मधील बालगृह रोड काँक्रिटीकरणाचा प्रारंभ आ. अहिरे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, व्यापारी बँकेचे जेष्ठ संचालक निवृत्ती आरिंगळे, जनसंपर्क संचालक अरुण जाधव जिल्हा उपाध्यक्ष विलासराव धुर्जड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, सोमनाथ बोराडे, मनोहर कोरडे आदी उपस्थित होते.
आ. आहिरे यांनी कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्ते पाणी हे ज्वलंत प्रश्न असून, त्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. वॉर्ड क्रमांक चार मध्ये स्वतंत्र जलकुंभ, तर संपूर्ण शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. तांत्रिक मान्यतेसाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून, प्रशासकीय मान्यतेनंतर नगर उत्थान योजनेंतर्गत ही योजना मार्गस्थ होणार आहे. पाच वर्षांत येथील प्रत्येक घरात पाणी व दारापर्यंत रस्ता हा झालेला असेल हा शब्द देत असल्याचे सांगितले. विलासराव धुर्जड यांनी प्रास्ताविक केले. सुभाष बोराडे व विजय निकम यांनी आ. अहिरे यांचा सत्कार केला. या प्रसंगी विक्रम कोठुळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव हारक, कौशल्या मुळाणे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष नीलेश बंगाली, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बोराडे, वंचितचे रामा निकम, रघुनाथ देवकर, मधुकर हारक आदी उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंटचे विलीनीकरण महानगरपालिकेत व्हावे असे सर्वांना वाटत होते. आपणही त्याच मताचे होतो, मात्र लष्करी अटी व बंधने यामुळे मनापा प्रशासनाने स्पष्ट नकार दिला, तर भगूर नगरपालिका आर्थिक स्थिती लक्षात घेता, त्यात विलीनीकरण करणे योग्य नसल्याने आपण आग्रह करून देवळालीसाठी स्वतंत्र नगर परिषद मंजूर करून घेतली आहे. या माध्यमातून राज्य शासनाच्या सर्व योजना येथे लागू केल्या जातील.आमदार सरोज आहिरे, देवळाली मतदारसंघ, नाशिक.