देवळा : पुढारी वृत्तसेवा
विंचूर - प्रकाशा महामार्गावरील कापशी भावडे फाटा येथे उभ्या असलेल्या पादचाऱ्याचा शनिवारी (दि. २७) सकाळी ९ च्या सुमारास भरधाव एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. निंबा भदाणे नाशिककडून देवळ्याच्या दिशेने याबाबत अधिक माहिती अशी, निंबा केदा भदाणे (६७, रा. कापशी) असे मृताचे नाव आहे.
त्यांना येणाऱ्या नाशिक - नंदुरबार बस (एमएच १४, केक्यू ०२४५) ने तीव्र उतारावर जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातप्रकरणी बसचालक सुनील शिंदे (पंचवटी आगार) यांच्यावर देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाने १० हजार रुपयांची तातडीची मदत भदाणे कुटुंबाला दिली असून अपघात दावा मंजूर झाल्यावर १० लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे सटाणा आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.
विंचूर - प्रकाशा मार्गावरील एनएच ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटिकरण काम झाल्यानंतर या ठिकाणी कापशी व भावडे या दोन गावांची चौफुली व भावडबारी घाटाचा तीव्र उतार असल्याने हा परिसर धोकादायक व अपघात प्रणव क्षेत्र झालेला आहे. त्यामुळे येथे गतिरोधकासह आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असताना त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सायंकाळी पुन्हा बसचा अपघात
याच परिसरात भावडे फाट्यानजीक वळणावर शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास भावडबारी घाटाच्या पायथ्याशी पुन्हा शहापूर आगाराची बस (एमएच २०, बीएल ३१९२) चा अपघात झाला. महामार्गावरील कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस शेतात गेली.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे नुकसान झाले. या महामार्गावर एकाच दिवशी दोन बसच्या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. शहापूर आगाराची ही बस नाशिककडून साक्रीकडे जात होती.