देवळा : विंचूर - प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जीवर रामेश्वर(वरचा) फाट्याजवळ गुरुवारी, (दि १४) रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने पूण्याहून सटाण्याकडे जाणाऱ्या साटाणा आगाराची पूणे - सटाणा एसटी बस (क्रमांक एम. एच. १४, एल. एक्स. ७८५१) व पुढे चालणारी दुचाकी (क्रमांक एम. एच. १७, ए. वाय. २३४१) यांच्यात भीषण अपघातात झाला. यामध्ये दुचाकीवरील तिघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरी तीघे बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला.
अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिकक्ष सार्थक नेहेते व सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने अपघातातील मृतांना बाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रात्री उशीरा दुचाकी वरील तिघांची ओळख पटवण्यात आली आहे.
अंबादास एकनाथ कुंवर (रा. आंजग ता. मालेगाव), मोहन प्रकाश वाघ (रा बेज. ता. कळवण) व भरत फकिरा पवार (रा. सोमपूर ता. सटाणा) अशी मृतांची नावे आहेत. ते भऊर येथे कामाला असल्याचे प्रथमदर्शनी समजते. अपघात प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरिकक्ष सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करित आहेत.