देवळ्यात बँक फसवणुकीचा मोठा पर्दाफाश 
नाशिक

Nashik fraud: देवळ्यात बँक फसवणुकीचा मोठा पर्दाफाश! 'देमको' बँकेला ५४ लाखांचा गंडा घालणारे पाच आरोपी जेरबंद

संशयितांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुढारी वृत्तसेवा

देवळा : बँकेत तारण ठेवलेले सोने हे शुद्ध व योग्य वजन असल्याचे खोटे अहवाल बँकेला वेळोवेळी सादर करून येथील देमको बँकेची तब्बल ५४ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या पाच संशयित आरोपींना सोमवार (दि.६) देवळा पोलिसांनी अटक केली. त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील देमको बँकेचे व्यवस्थापक सुनील भालेराव यांनी ५ जुलै २०२४ रोजी याबाबत फिर्याद दाखल केली होती. त्यात बँकेचे व्हॅल्यूअर राजेंद्र मोतीराम सोनवणे (वय ५०, रा, कापशी ता.देवळा) यांनी कर्जप्रकरण पास करताना बँकेचे खातेदार यांच्या सोने-चांदी तारण ठेवतेवेळी सोन्याचांदीची शुद्धता प्रामाणिकपणे ठरविणे बंधनकारक असताना श्री. सोनवणे यांनी काही खातेदारांची संगनमत करून बँकेचा विश्वासघात केला. सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत या बँकेच्या तब्बल २७ खातेदारांची संगनमत करून कर्जप्रकरण करताना या खातेदारांचे सोने गहाण ठेवतेवेळी सदोष, त्रुटी व तफावत असलेले किंवा बनावट व दुय्यम सोने बँकेत तारण म्हणून ठेवून घेतले. आणि हे सोने शुद्ध व योग्य वजन असल्याचा खोटा अहवाल बँकेला सादर केला.

या अहवालावरून बँकेने नमूद २७ संशयित आरोपी खातेदारांना ५४ लाख ७४ हजार रूपये कर्ज मंजूर केले. या २७ जणांत कापशी येथील सहा, गुंजाळनगर सहा, देवळा पाच, सुभाषनगर व रामेश्वर प्रत्येकी दोन तर भिलवाड, वाखारवाडी, पिंपळगाव, सरस्वतीवाडी, वरवंडी येथील प्रत्येकी एका खातेदारांचा यात समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेचे एकूण ५४ लाख ७४ हजार रु. व अधिक येणे व्याज रुपयांची फसवणूक झाल्याचा सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा देवळा पोलिसांनी कसून तपास करत नारायण गणपत पवार (रा. गुंजाळनगर, मुकेश सुभाष निकम रा. वाखारवाडी), युवराज गंभीर मेधने (रा.सरस्वतीवाडी), बापू उत्तम खैर (रा. सुभाषनगर), सुरेश निंबा पगार (रा.रामेश्वर) या पाच संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

देवळा पोलिसांच्या या तपास कामगिरीचे देमको बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, सभासद, खातेदार यांनी समाधान व्यक्त केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदा पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT