देवळा : देवळा शहराच्या मध्य वस्तीत भर दुपारी बंद घराचे कुलूप तोडून सोने व रोख रक्कम असा सुमारे अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे . घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला .
याबात अधिक माहिती अशी की, देवळा शहरातील मध्य वस्तीत असलेल्या शिवाजी नगरमध्ये राहणारे देवेंद्र शिवाजी निकम हे सोमवारी (दि.६) काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असता भर दुपारी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरूणांनी घरचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाट तोडून दहा हजार रुपये रोख व काही सोने असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज घेऊन पाबोरा केला. घरी परतल्यानंतर निकम यांच्या ही बाब निर्दशनास आल्यावर त्यांनी देवळा पोलिसांत धाव घेत अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली.
शहराच्या भर वस्तीत व दुपारच्या वेळी चोरीची घटना घडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे . पोलिसांनी या घटनेची तात्काळ चौकशी करून अज्ञात चोरट्यांचा शोध लावावा, अशी मागणी शहरातील रहिवाशांनी केली आहे . घरफोडी झालेल्या घरालागत असलेल्या दवाखान्यातील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आले असून, चोरटे या कॅमेरात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी हे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.