Dengue Cases Dengue Cases
नाशिक

Nashik Dengue Cases | नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला; ऑक्टोबरच्या पहिल्या 20 दिवसांत 82 नवीन रुग्ण

Nashik Dengue Cases | 20 दिवसांत 82 रुग्ण; बाधितांचा आकडा 264

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात सणासुदीच्या काळात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या २० दिवसांतच डेंग्यूची रुग्णसंख्या ८२ वर पोहोचली असून, जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण २६४ रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यूचा वाढता विळखा लक्षात घेता, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याचे चित्र दिसत आहे.

यंदा पावसाने विश्रांती घेतली असली, तरी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावासोबत तापसदृश्य आजारांचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांनी त्रस्त नागरिकांची रुग्णालयांकडे धाव सुरू असून, रुग्णालयांवरचा ताण वाढत असल्याचे चित्र आहे.

डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात डास उत्पत्तीस्थळांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान काही शासकीय कार्यालयांच्या आवारात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती आढळून आल्यामुळे संबंधित आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

तसेच डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील सहाही विभागात सर्वेक्षण सुरू केले होते. या कामासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रनिहाय विशेष पथकांची नियुक्ति करण्यात आली होती. या पथकांमध्ये आशा सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, ए.एन.एम. तसेच महापालिकेच्या कीटंक नियंत्रण विभागातील कंत्राटी कामगार आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.

नागरिकांची तपासणी करणे, डेंग्यूच्या संभाव्य उत्पत्तीस्थळांचा शोध घेणे आणि प्रतिबंधत्मक उपाययोजना राबविणे, अशी जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली होती. मात्र, सर्वेक्षण आणि विशेष मोहिमा राबवूनही डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ सुरूच असल्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT