Dengue Cases Spike  pudhari photo
नाशिक

Dengue Case | डेंग्यूचा डंख वाढला; जिल्हा परिषदेसह 208 आस्थापनांना नोटीसा

Dengue Case | डासांची उत्पत्ती आढळल्याने महापालिकेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी शहरात डेंग्यू आणि अन्य साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेचा मलेरिया विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने जिल्हा परिषद, नाशिकरोड रेल्वेस्टेशन, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय रुग्णालये यांसह शहरातील तब्बल २०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ. रवींद्र ढोले यांनी दिली.

पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरियासारख्या कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. रिकामे प्लॉट, बांधकामस्थळे, बेसमेंट, स्क्रॅप डेपो, टायर दुकाने तसेच छतावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साचल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते.

यंदा जूनपर्यंत डेंग्यूची स्थिती नियंत्रणात होती. जानेवारीत ६, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ३ आणि जूनमध्ये ८ रुग्ण आढळले. मात्र, जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली.

जुलैमध्ये ३३ रुग्ण आढळले, तर ऑगस्टच्या पहिल्या १४ दिवसांतच २९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे यंदाची एकूण डेंग्यू रुग्णसंख्या ८५ वर पोहोचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.
डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेऊन मलेरिया विभागाने घरोघरी तपासणी, अळी शोधमोहीम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विविध शासकीय कार्यालये तसेच बांधकामस्थळांवर तपासणीदरम्यान डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे. जुलैमध्ये १२०, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत ८८ आस्थापनांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

या आस्थापनांना नोटीसा

शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव, जिल्हा परिषद इमारत (सीबीएस), जिल्हा परिषद नवीन इमारत, नाशिकरोड रेल्वेस्थानक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांसह शहरातील विविध बांधकाम व्यवसायिकांच्या आस्थापनांचा नोटीस बजावलेल्या ठिकाणांमध्ये समावेश आहे.

धूरफवारणी कागदावरच ?

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात धूरफवारणी, फॉगिंग आणि अळीनाशक औषधांची फवारणी केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांत धूरफवारणी होत नसल्याची तक्रार नगरसेवकांकडून केली जात आहे. धूरफवारणीचा ठेका संपल्यानंतर संबंधित ठेकेदारांना महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष फवारणीऐवजी कागदोपत्री काम सुरू असल्याचा आरोप होत असल्याने डेंग्यूविरोधी मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डेंग्यूच्या अळ्या आढळणाऱ्या ठिकाणी तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत आठ शासकीय कार्यालयांसह २०८ आस्थापनांना डेंग्यूच्या अळ्या आढळल्याप्रकरणी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पाण्याच्या स्रोत तपासणे, फॉगिंग, औषधफवारणी तसेच जनजागृतीचे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
- डॉ. रवींद्र ढोले, मलेरिया विभागप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT