नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, गेल्या १४ दिवसांतच डेंग्यूचे २९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एवढेच नव्हे तर शहरात तापसदृश आजाराची साथी पसरली असून, गेल्या आठवडाभरातच तापसदृश आजाराचे हजारांवर रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाची झोप उडाली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात साथरोगाचा प्रादुर्भाव वेगाने होतो. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांची लागण होते. यंदाही नाशकात डेंग्यूने थैमान घातले आहे. जूनपर्यंत डेंग्यूची रुग्णसंख्या आटोक्यात होती. जानेवारीत ६, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ३ तर जून महिन्यात जेमतेम ८ रुग्ण होते.
जुलैत पावसाचा जोर वाढल्यानंतर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली. जुलै महिन्यात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले. ऑगस्ट महिना सुरू होताच डेंग्यूचा प्रादुर्भाव दुपटीने अधिक वाढला. त्यामुळे आतापर्यंतच्या डेंग्यू रुग्णांची संख्या ८५ वर गेली आहे.