शहरात डेंग्यू, साथरुग्णांत वाढ pudhari file photo
नाशिक

Nashik Dengue Swine Flu Cases | नाशिकमध्ये स्वाइन फ्लू अन् डेंग्यूचा प्रकोप! मनपा प्रशासन 'ॲक्शन मोड'वर आरोग्य यंत्रणा अलर्ट

Nashik Dengue Swine Flu Cases | आरोग्यवर्धिनी केंद्रनिहाय पथके, सर्वेक्षण, फवारणीला वेग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेच्या माहितीनुसार, जानेवारी ते जूनदरम्यान स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये ही संख्या १३, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत १६ रुग्णांवर पोहोचली आहे. डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली असून, जानेवारी ते जूनदरम्यान २३ रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये ३३, तर ऑगस्टमध्ये २८ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत.


साथरोगाचा उद्रेक रोखण्यासाठी प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रनिहाय विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात आशासेविका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, एएनएम तसेच महापालिकेच्या पेस्ट कंट्रोल विभागातील कंत्राटी कामगार व फिल्ड वर्कर यांचा समावेश आहे. पथकांकडून घर, रस्ते, कॉलनी आणि परिसराचे सर्वेक्षण करून तापाचे रुग्ण शोधले जाणार आहेत.

संशयित रुग्णांना आवश्यकतेनुसार मनपाच्या रुग्णालयात संदर्भित केले जाणार आहे.
यासोबतच घरांमध्ये व परिसरात डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करणे, आवश्यक ठिकाणी औषध फवारणी करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

नागरिकांनी घर व परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत आणि कुलर, कुलदाण्या व अन्य पाणी साठवण्याच्या वस्तूंची आठवड्यातून किमान एकदा स्वच्छता करावी. ताप, खोकला, घसा दुखणे किंवा अंगदुखीची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी कोरडा दिवस पाळून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT