नाशिक

Lok sabha Election 2024 Results : कांदा पट्ट्यातील विद्यमान खासदारांना दणका ! वाट्याला पराभव

गणेश सोनवणे

[author title="सटाणा (जि. नाशिक) :सुरेश बच्छाव" image="http://"][/author]

उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांची नाराजी भाजपला चांगलीच भोवली असून या ठिकाणी विद्यमान खासदारांना पराभवाचे धनी व्हावे लागले आहे. दुसरीकडे दिल्ली दरबारी कांद्याची बाजू लावून धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांना मात्र मोठ्या मताधिक्याने संसदेत जाण्याची संधी मिळाली आहे. साहजिकच यावरून यंदाच्या लोकसभा निवडणूकीत कांदा हा सर्वाधिक महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक मुद्दा ठरला आहे.

कांद्याचे दर वाढल्याने दिल्लीतील भाजपाचे राज्य सरकार कोसळल्यानंतर कांदा हा कायमचा राजकीय मुद्दा बनला. कांद्याचे दर वाढल्यास निवडणुकीत फटका बसतो, हे गृहीतक धरून नेहमीच कांद्याचे दर रोखून धरण्यावर भर देण्यात आला. यंदाच्या निवडणुकीत मात्र कांद्याचे दर रोखून धरल्यामुळे शेतकऱ्यांचेही होणारे नुकसान राजकारण्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी कांदा उत्पादकांनी चांगलाच चंग बांधला होता! आणि अखेर कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांनी भाजप विरोधात कौल देत भाजपाच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली आहे. कांद्याचे दर वाढल्याने ग्राहक नाराज होऊन राजकीय नुकसान होते, त्याच पद्धतीने कांद्याचे दर पाडून शेतकरीही नाराज होऊन त्यामुळेही राजकीय नुकसान होऊ शकते हे दाखवून देण्यासाठी ही निवडणूक शेतकऱ्यांनी अक्षरशः हातात घेतल्याचे दिसून आले.

भाजपा शासनाने कांदा निर्यातबंदी घोषित करून वेळोवेळी उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. ऐन निवडणूक काळात देखील केंद्र शासनाने केवळ ग्राहकांचा विचार करीत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आणि असंतोष निर्माण झाला. भारत जोडो यात्रा दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन व्यथा जाणून घेतली. तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र भर सभेत कांद्यावर बोला असे सांगूनही त्यावर न बोलता जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चिथावल्यासारखे झाले आणि त्यांनी मतदानाच्या दिवशी देखील मतदान केंद्रापर्यंत कांदाच्या माळा घालून जात आपला संताप दाखवून दिला. प्रत्यक्ष मतदानही त्याच पद्धतीने झाले असून निकालावरून कांद्याने भाजपाचे वांदे केल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात यामुळे आगामी काळात कांदा उत्पादकांच्या हिताकडे लक्ष दिले जाईल का? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.

कांदा पट्टातील खासदार

भारती पवार, हेमंत गोडसे, हिना गावित, सुजय विखे, सुभाष भामरे, अढळराव पाटील,
सदाशिव लोखंडे, राम सातपुते, रणजितसिंग निंबाळकर या सगळ्या कांदा पट्ट्यातील खासदारांना लोकसभा निवडणूकीत पराभव पत्कारावा लागला आहे.

SCROLL FOR NEXT