देवळाली कॅम्प (नाशिक) : केंद्रात व राज्यात आमच्या विचाराचे सरकार असून अर्थ खाते माझ्याकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत असल्याने भगूरकरांसाठी सर्व काही खुले करू असे सांगत नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री मीच आहे असा मिश्किली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगूर येथील सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, उबाठा युतीच्या नगराध्यक्षपदाच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत. भगूर नगरी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे. या पुण्यभूमीचा विकास गेल्या पंचवीस वर्षात पाहिजे तसा झाला नाही. केवळ धुराळा उडविला म्हणजे विकास नाही. देवाळीत कोणालाही न घाबरता, न डगमगता बापाप्रमाणे धाडसी असलेली ‘आमची बहीण’ देवळाली मतदारसंघांत सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताने निवडून आल्याचे सांगत आ. आहेर यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच राजकारणासाठी राजकारण आहे. मात्र, विकासाच्या आड कोणी येत असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही पवार यांनी दिला. यावेळी आमदार सरोज आहिरे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आ. दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी खा. देविदास पिंगळे, निवृत्ती आरिंगळे, एकनाथ शेटे, तानाजी करंजकर, सोमनाथ बोराडे, दीपक बलकवडे, बाळासाहेब म्हस्के, काकासाहेब देशमुख आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनी केले. बाळासाहेब मस्के यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
राज्यातील दुष्काळी स्थितीवर भाष्य करताना बळीराजाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. 44 हजार कोटीचे पॅकेज दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री शहा यांनी देखील राज्याला भरघोस मदत दिल्याचे सांगितले. तसेच नाशिक जिल्हा बँकेची अवस्था वाईट असली तरी तिला उभारी देण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.