नाशिक : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतून नाशिकच्या उद्योग क्षेत्राला मोठ्या अपेक्षा असून, यंदा तरी नाशिकला एखादा ‘मेगा प्रोजेक्ट’ यावा, अशी नाशिकचे उद्योग क्षेत्र आस लावून आहे. मागील तीन वर्षांपासून नाशिकच्या वाट्याला ठेंगाच मिळत असल्याने, त्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा आहे. त्यातच महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसचा उल्लेख करीत गुंतवणूक आणण्याचा शब्द दिल्याने, नाशिकच्या उद्योजकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषद सुरू असून, त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले आहेत. या परिषदेतून मागील तीन वर्षांत राज्यातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूर आदी जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली गेली. मात्र, उद्योगांसाठी अत्यंत पोषक जिल्हा असूनही नाशिकच्या तोंडाला तिन्ही वर्षांत पाने पुसण्यात आली आहे.
2023 मध्ये उद्योगमंत्री सामंत यांनी दावोसला घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन महिंद्रा ॲण्ड महिंद्राचा 10 हजार कोटींचा विस्तार प्रकल्प नाशिकला होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रकल्प चाकणला होणार असल्याचे नंतर समोर आले. यंदा 23 जानेवारीपर्यंत ही परिषद चालणार असून, अखेरच्या दिवशी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (दि.20) परिषदेच्या पहिल्याच दिवशी 14 लाख 50 हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात ही गुंतवणूक केली जाणार असली तरी, नाशिकचा यात समावेश नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत नाशिकसाठी मोठी घोषणा होईल, अशी उद्योजकांना अपेक्षा आहे.
दोन अँकर युनिट द्यावेत
मागील 20 वर्षांपासून नाशिकमध्ये एकही मोठा उद्योग आला नसल्याने, दावोस परिषदेतून दोन अँकर युनिट यावेत, अशी नाशिकच्या उद्योग क्षेत्राला अपेक्षा आहे. नाशिकला इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक क्लस्टरची यापूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत फारशा हालचाली नसल्याने, या परिषदेतून क्लस्टरला चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याचे सीईओ म्हणून दावोसला गेले आहेत. नाशिक व उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा, कामगार, मुबलक सुविधा उपलब्ध असून, अधिकाधिक गुंतवणूक येणे अपेक्षित आहे.आशिष नहार, अध्यक्ष, निमा