नाशिक

Nashik Daregaon Kanifnath Yatra | दरेगावात रंगपंचमीला कानिफनाथ यात्रोत्सव उत्साहात

हजारो भाविकांची उपस्थिती; ‘प्रती मढी’ म्हणून दरेगावची ओळख

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : तालुक्यातील दरेगाव येथील आराध्यदैवत ओम चैतन्य कानिफनाथ महाराजांचा पारंपरिक यात्रोत्सव रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या यात्रोत्सवासाठी जिल्हाभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावत कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

दरेगाव येथे कानिफनाथ महाराजांनी काही काळ विश्राम केल्याची आख्यायिका असल्याने या गावाला ‘प्रती मढी’ म्हणून ओळखले जाते. गेल्या शेकडो वर्षांपासून रंगपंचमीच्या दिवशी येथे भव्य यात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम आहे. हा सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यासाठी जिल्हाभरातील भाविक मोठ्या संख्येने दरेगावात दाखल झाले होते.

रंगपंचमीच्या दिवशी सकाळी कानिफनाथ महाराजांचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. पुढे सुशोभित रथातून कानिफनाथ महाराजांची भव्य रथयात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली. रथात नऊ नाथांची वेशभूषा परिधान केलेले नवनाथ व गुरुदत्त विराजमान करण्यात आले होते.

रथ ओढण्यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरची बैलजोडी देण्याची परंपरा आहे. रथाच्या पुढे भजनी मंडळ, सनईच्या सुरात गंगेच्या पाण्याने भरलेले कावड नाचवले जात होते. गावातील प्रत्येक घरासमोर रथाचे औक्षण करण्यात आले. मुख्य चौकात रथ आल्यानंतर नवस पूर्ण झालेल्या भाविकांनी रथासमोर लोटांगण घालत आपली श्रद्धा व्यक्त केली.

रथयात्रेच्या स्वागतासाठी गावातील रस्त्यांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच शेणाचे सडे टाकण्यात आले होते. मंदिरासमोर रथ पोहोचल्यावर भाविकांनी हवेत रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर जल्लोष केला. या सोहळ्याला हजारो नागरिक उपस्थित होते.

यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराचा गाभारा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या ध्वज काठ्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. “कानिफनाथ महाराज की जय” आणि “ॐ नमो आदेश” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.सायंकाळी कानिफनाथ महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी जिल्हाभरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

‘दरेगाव’ला ‘विश्राम मढी’चा लौकिक

गिरणार पर्वतावर तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर कानिफनाथ महाराज ७०० शिष्यांसह विश्वभ्रमंती करत होते. त्या वेळी त्यांनी दरेगाव येथे काही काळ विश्राम केला होता. त्यानंतर ते मढी गावाच्या दिशेने रवाना झाले. त्या स्मरणार्थ दरेगाव येथे दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी हा पारंपरिक यात्रोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे या ठिकाणाला ‘प्रती मढी’ म्हणून विशेष ओळख मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT