नाशिक : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकांच्या पुनर्विकासावर 10 कोटींचा खर्च केल्यानंतर आता हा प्रकल्प खासगी ठेकेादाराच्या हाती सोपविण्याचा घाट रचला जात आहे. यासाठी पीपीपी अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर महापालिकेने देकार मागविले असून, स्मारकाच्या प्रवेश शुल्कापोटी जमा होणाऱ्या उत्पन्नातून ५० टक्के वाटा महापालिकेला, तर ५० टक्के ठेकेदाराला देण्याची योजना आहे.
गेल्या २६ वर्षांपूर्वी १९९९ मध्ये महापालिकेने पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली होती. सुरुवातीला महापालिकेच्या उत्पन्नाचे साधन ठरलेल्या या प्रकल्पाची कालांतराने दुरवस्था झाली. प्रकल्प तोट्यात गेला. या प्रकल्पाच्या देखभाल - दुरुस्तीवर आजवर 12 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र त्यानंतरही या प्रकल्पाची दैना कायम आहे. प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी अनेक मॉडेल आणले गेले, मात्र निधी कोणी खर्च करायचा, फाळके स्मारकाचा विकास होऊ शकला नाही. कैलास जाधव यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात प्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केल्यानंतर खासगीकरणाचा प्रयत्न फसला होता. हा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातूनच चालविला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी पर्यटन विभागाकडून ४० कोटींचा निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर प्रकल्पाच्या दुरुस्तीविषयक कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १० कोटी खर्च करून नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे. विद्युत रोषणाई, संगीत कारंजा सुरू करणे, म्युझियम आदी कामे या निधीतून केली जात आहेत. ही कामे झाल्यानंतर मात्र फाळके स्मारकाचे खासगीकरण करण्यात येणार आहे.
---
खर्च महापालिकेचा, उत्पन्न ठेकेदाराला
फाळके स्मारकाच्या पुनर्विकासावर 10 कोटी खर्च केल्यानंतर आता या प्रकल्पाचे खासगीकरण करून ठेकेदाराचे हित जोपासण्याची पूर्वापार चालत असलेली परंपरा प्रशासनाकडून यंदाही जोपासली जात असल्याचे चित्र आहे. यासाठी महापालिकेने मक्तेदारांकडून देकार मागविले आहे.
---
कोट :
१० कोटी रुपये खर्च करून फाळके स्मारकाचे नूतनीकरण केले जात आहे. नाशिककरांना या उद्यानाचा आनंद घेता यावा यासाठी लवकरात लवकर व्यवस्थापक निश्चित केला जाणार आहे.
- संजय अग्रवाल, शहर अभियंता
-----
-------०--------