Nashik Pune Railway
नाशिक-पुणे रेल्वेच्या मंजुरीसाठी दादा भुसेंचे रेल्वेमंत्र्यांना पत्र file photo
नाशिक

नाशिक-पुणे रेल्वेच्या मंजुरीसाठी दादा भुसेंचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणामध्ये नाशिक-पुणे ही दोन शहरे अद्यापही रेल्वेलाइनने जोडली नसल्याने, दोन्ही शहरांमधील दळणवळणाला खीळ बसलेली आहे. रस्ते मार्गाने नाशिक-पुणे अंतर पाच ते सहा तासांचे असल्यामुळे, जलद प्रवासाचा अभाव प्रकर्षाने दिसून येतो. दोन्ही शहरे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याने, या शहरांना रेल्वे मार्गाने जोडणे गरजेचे आहे. त्यामुळे नाशिक-रेल्वे रेल्वेलाइन प्रकल्पास केंद्र सरकारने जलदगतीने मंजुरी द्यावी, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, नाशिक-पुणे रेल्वेलाइन प्रकल्प एमआरआयडीसीद्वारे जलदगतीने कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पास १५ एप्रिल २०२१ रोजीच मंजुरी दिलेली असून, १६ फेब्रुवारी २०२२ रोजी रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या अगोदर २८ जुलै २०२१ रोजी या प्रकल्पास मध्य रेल्वेकडून मंजुरी दिली गेली आहे. आता हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविलेला असून, भारत सरकारच्या कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन, वन हस्तांतरण आणि शासनाचे काम हे प्रगतिपथवार आहे. त्यामुळे केंद्राने या प्रकल्पास मंजुरी दिल्यास उर्वरित कामे तातडीने मार्गी लावणे शक्य होईल, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, तो लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी मागणी व्यापारी, उद्योजकांकडून सातत्याने केली जात आहे.

असा आहे प्रकल्प

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग २३२ किलोमीटरचा आहे. या मार्गावर १८ बोगदे असणार आहेत. तसेच १९ उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. 200 किलोमीटर प्रतितास वेगाने सेमी हायस्पीड रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. हा मार्ग सुरुवातीपासूनच संपूर्ण विद्युतीकरण झालेला असणार आहे. या मार्गावरून पहिल्या टप्प्यात सहा कोचची, त्यानंतर १२ ते १६ कोचची रेल्वे धावणार आहे. मार्गावर एकूण २० स्थानके असणार आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुणे-नाशिक पाच ते सहा तासांचा प्रवास अवघ्या एक तास ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

फाइल धूळ खात

सर्वप्रथम २००८ मध्ये घोषणा करण्यात आलेल्या या प्रकल्पाची फाइल राजकीय अनास्थेमुळे रेल्वे मंत्रालयात धूळ खात पडून आहे. नाशिक-नगर-पुणे अशा तीन जिल्ह्यांसाठी वरदान ठरणाऱ्या या सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे तिन्ही जिल्ह्यांतील कृषी, पर्यटन तसेच औद्योगिक विकासाला बळ मिळणार आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत, अंतरात बचत होणार आहे. मात्र, राजकीय साठेमारीत हा प्रकल्प अडकून पडला आहे. आता नव्याने त्याचा पाठपुरावा केला जात असल्यामुळे त्यास कितपत यश येणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT