नाशिक : सत्ताधाऱ्यांमध्ये खातेवाटपाचा तिढा कायम असताना, उतावीळ नेटकऱ्यांनी मात्र मंत्र्यांना विविध खाते बहाल करण्यास प्रारंभ केला आहे. मंत्री दादा भुसे यांना थेट शिक्षणमंत्री करीत त्यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल केल्या. काहींनी साहेबांचे अभिनंदनपर स्टेटस ठेवत, यात आणखीनच भर घातली. अखेर मंत्री भुसे यांना त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून याबाबतचा खुलासा करावा लागला.
महायुतीला जनतेने प्रबळ बहुमत दिल्यानंतरही मंत्रीमंडळ अन् खातेवाटपाचा विलक्षण असा तिढा बघावयास मिळत आहे. अगोदर मंत्रीपदावरून सुरू असलेली रस्सीखेच निवळत नाही, तोच आता खाते वाटपाचा तिढा वाढला आहे. बुधवारी (दि. १८) महायुतीत खातेवाटप जाहीर केले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, काही मंत्रीपदावरून तिन्ही पक्षात तिढा असल्याने बुधवारचा देखील मुहूर्त टळला. सत्ताधाऱ्यांचा हा घोळ सुरू असताना उतावीळ नेटकऱ्यांनी मात्र, काही मंत्र्यांना त्यांचे खातेही बहाल केले. मंत्री भुसे यांना शिक्षणमंत्री म्हणून घोषित करीत, त्याबाबतच्या पोस्ट तुफान व्हायरल केल्या. तशी स्टेट्स ठेवण्याची स्पर्धा सुरू झाली. काहींनी तर थेट मंत्री भुसे यांच्या व्हाॅट्स अॅपवर अभिनंदन करणारे संदेश पाठविले. फेसबुक, एक्स तसेच इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून व्हायरल केल्या गेल्या. मंत्री भुसे शिक्षणमंत्री झाल्याची दिवसभर खमंग चर्चा समाजमाध्यमांवर रंगली होती. अर्थात ही अफवा असल्याने, अखेर भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयालाच याबाबतचा खुलासा करावा लागला.
दरम्यान, नाशिकला दादा भुसे यांच्यासह नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे असे तीन मंत्री लाभले असून, त्यांना नेमकी कोणती खाते मिळतात? याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
मंत्री दादा भुसे यांना महत्त्वाचे पद मिळावे, अशी समर्थक, कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र, खातेवाटपाबाबत अद्याप कुठलाही शासकीय आदेश निर्गमित झालेला नाही. तरी कार्यकर्ते आणि नागरिकांकडून साहेबांना शिक्षणमंत्री पद मिळाल्याच्या चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्या जात असून, यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे. शासकीय आदेशाची वाट पहावी, अफवा तसेच चुकीच्या बातम्या पसरवू नये, असे आवाहन मंत्री भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.