नाशिक : विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना दादा भुसे. समोर उपस्थित संस्थाचालक व मुख्याध्यापक. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Dada Bhuse | विद्यार्थीनी सुरक्षेबाबत दोन दिवसात रिझल्ट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : बदलापूर येथील घटना दुर्दैवी असून, शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबद्दल दोन दिवसांत रिझल्ट दिसेल, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. दामिनी पथकांना मुक्तपणे काम करण्याची मुभा देताना शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत पेट्रोलिंगमध्ये वाढ करावी, असे निर्देश भुसे यांनी पोलिस प्रशासनाला दिले.

प्रमुख मागण्या अशा

  • प्राध्यापकांच्या रिक्त ११,५०० जागा भराव्या

  • विद्यार्थी-पालकांचे समुपदेशन करावे.

  • शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावरील गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींचा बंदोबस्त करावा.

  • नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाइलबद्दल समुपदेशन करावे.

  • शिक्षकांची निवडणूक कामातून मुक्तता करावी.

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (दि. २१) नाशिकमधील विद्यार्थिनींची सुरक्षा व उपाययोजनांबाबत आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये पार पडलेल्या बैठकीप्रसंगी आमदार दिलीप बनकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, प्राचार्य हरीश आडके यांच्यासह संस्थाचालक व मुख्याध्यापक उपस्थित होते.

प्रायमरी व प्री-पायमरी स्कूलमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल कायदा करताना शाळांमध्ये विशाखा समिती, सखी-सावित्री समिती ॲक्टिव्ह कराव्या, अशी मागणी संस्थाचालक व शिक्षकांनी केली. तसेच शैक्षणिक संस्थांमधील वर्ग ३ व चारची पदभरती पुनर्जीवित करावी. शिक्षकांकडील शाळाबाह्य कामे काढून घेताना अधिकचे अधिकार द्यावे. शाळा-महाविद्यालये भरणे व सुटण्याच्या वेळेत पोलिस गस्त वाढवावी. शाळा-महाविद्यालयांमधून मदतीसाठी कॉल आल्यावर पोलिसांकडून त्वरित प्रतिसाद मिळावा. शाळांमध्ये महिला स्वच्छतागृहाबाहेर महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सीसीटीव्हीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आदी सूचना व मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दादा भुसे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती करताना कर्मचाऱ्यांची पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी करून घ्यावी. स्कूल बस, व्हॅन तसेच रिक्षाचालकांचे प्रबोधन करावे. प्रत्येक शाळेत तक्रार पेटी उपक्रम राबविण्याची सूचना केली. तसेच गावपातळीवर सखी-सावित्री समिती जागृत असतात. त्यामुळे या समित्यांचे पुनर्गठन करावे, असेही भुसे यांनी सांगितले.

टपऱ्यांवर कारवाई करावी

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील टपऱ्यांवर तातडीने कारवाई सुरू करावी, असे आदेश दादा भुसे यांनी महापालिका व पोलिस प्रशासनाला दिले आहेत. संस्थाचालकांच्या सूचनेनूसार लॉजिंगची तपासणी मोहीम राबवावी, असेही भुसे यांनी पोलिस विभागाला सांंगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT