मुंबई : 'गुणवत्तापुर्ण आनंददायी शिक्षणपध्दती' चर्चासत्रात शिक्षकांना मार्गदर्शन करतांना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे. Pudhari
नाशिक

Dada Bhuse | गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी रोडमॅप तयार करा

मुंबईतील चर्चासत्रात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार न होता जीवनासाठी तयार होतात, आणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत बनतो. यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावे व रोडमॅप तयार करावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रविवारी (दि.5) केले.

'गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती' या विषयावर जयहिंद महाविद्यालय, मुंबई येथे आयोजित चर्चसत्रात मंत्री भुसे बोलत होते. यावेळी आमदार जयंत आजगावकर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, राज्याच्या शिक्षण विभागाचे आपण सर्वचजण एक घटक आहोत. आपण भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदानाचे जे पवित्र काम करत आहात ते अतुलनीय व भाग्याचे आहे. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती हा आव्हानात्मक विषय असला तरी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून तो यशस्वीपणे राबविला जाईल याची खात्री आहे. विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवून शिक्षण विभागाचा एक रोडमॅप आपण ठरवू. येणार्‍या काळात शैक्षणिक धोरण राबविताना सर्वांना सोबत घेऊन आपण काम करू या, असे आवाहन त्यांनी केले.

या चर्चासत्रात शाळांमध्ये भौतिक सुविधा, संगणक प्रणालीचा वापर वाढविणे, मुख्याध्यापकांच्या नियमित कार्यशाळा, वेतनेतर अनुदान वाढविणे, कॅडमी शिक्षणावर शासनाचे नियंत्रण, जिल्हा परिषद शिक्षण विभाग पदोन्नती मध्ये शिक्षकांना संधी, राष्ट्रीय, राज्य, विभाग, जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ, अशैक्षणिक कामापासून शिक्षकांची सुटका, जुनी पेन्शन योजना, प्रत्येक शाळेत कला व क्रीडा शिक्षक, सीबीएससी पॅटर्न लागू करणे, माध्यमिक शिक्षक संच मान्यता ऑनलाईन व्हावी, वेतन वेळेत व्हावे, अंशदायी अनुदान लवकर मिळावे अशा मागण्या विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडल्या. आमदार जयंत आजगावकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT