नाशिक : गेल्या आठवड्यात गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परतली आहे. रविवारी (दि.३०) अचानकच तापमान ९.९ अंश सेल्सिअसवर गेल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. श्रीलंकेत थैमान घालणारे दित्वा चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम झाला असून, उत्तर भारतातून थंड वारे वाहू लागल्याने पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही घट झाल्याने, नाशिककरांना दिवसभर थंडीचा सामना करावा लागत आहे. आगामी तीन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याने थंडीचा अलर्ट दिला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात किमान तपामानात सातत्याने चढउतार होत आहे. गेल्या आठवड्याच्या प्रारंभी पारा १७ अंशांवर गेल्याने, थंडी गायब झाली होती. किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही वाढ झाल्याने, थंडीचा प्रभाव नाहीसा झाला होता. मात्र, श्रीलंकेत आलेल्या डिटवाह चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रवाद झाल्याने, पारा घसरला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने, गारठा वाढला आहे.
शहरावर धुक्याची चादर
राज्यातील काही भागात तुरळक, हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तविली आहे. पहाटेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत शहरावर धुक्याची चादर पसरत असल्याने, सकाळी घराबाहेर पडणे नाशिककरांकडून टाळले जात आहे. सकाळी धुके, दिवसभर निसभ्र आकाश आणि रात्री थंडीचा कडाका असे वातावरण सध्या अनुभवयास मिळत आहे. दरम्यान, रविवारी नाशिक शहराचे किमान तापमान ९.९ तर कमाल तपामान २७.७ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. दरम्यान, पुढील काही दिवसात पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
निफाड गारठले
नाशिक शहराबरोबरच निफाडचा देखील पारा घसरला आहे. रविवारी (दि.३०) निफाडचे किमान तापमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. दरवर्षी निफाड राज्यातील सर्वाधिक थंड शहर म्हणून पुढे येत असते. याठिकाणी यापूर्वी बर्फवृष्टी झाल्याची देखील नोंद आहे. यंदा देखील अशाचप्रकारच्या थंडीचा निफाडकरांना सामना करावा लागण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.