लासलगाव (नाशिक) : डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज आणि ब्रिटिश उच्च आयुक्तालय, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे सायबर फॉर हर हॅकथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील वैष्णवी गाजरे हिने सायबर सुरक्षा क्षेत्रात देशात चौथा क्रमांक मिळवत दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
प्राथमिक व उपांत्य फेरीत महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक मिळवत वैष्णवी हिने दिल्ली येथील महा-अंतिम फेरीत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1500 स्पर्धकांमध्ये स्वतःचे कौशल्य आणि ज्ञान दाखवत देशात चौथा क्रमांक पटकवला. सायबर सुरक्षा ही आधुनिक काळाची गरज असून, तंत्रज्ञानाच्या विकासासोबत डेटा सिक्युरिटी ही सर्वात महत्त्वाची आहे.
या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत वैष्णवीने आपल्या कौशल्य शक्तीचा आणि प्रतिभादृष्टीचा वापर करत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्र सायबर मुख्यालयाचे डीआयजी आयपीएस संजय शिंत्रे यांच्या हस्ते वैष्णवीचा सत्कार करण्यात आला. या सोबतच केपीएमजी आणि एल अँड टी यांच्या मार्गदर्शकांनी तिचे कौतुक केले. राष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करत देशात मान उंचावणाऱ्या वैष्णवीचे गाजरवाडी येथेही काैतुक करण्यात येत आहे.