नाशिकरोड : भारत सरकारच्या गांधीनगर मुद्रणालयात लवकर भरती करण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्रालयाने खासदार राजाभाऊ वाजे यांना दिले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुद्रणालय भरती व आधुनिकीकरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
भारत सरकारच्या गांधीनगर मुद्रणालयात अनेक वर्षांपासून नोकरभरती नसल्यामुळे कामगार संख्येत घट झाली आहे. देशातील १८ पैकी १३ मुद्रणालये बंद झाली असून गांधीनगर मुद्रणालयावरही बंदची टांगती तलवार होती. या पार्श्वभूमीवर खासदार वाजे यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर प्रेस कामगार युनियनचे सरचिटणीस प्रमोद पवार, सहसचिव राहुलकुमार आणि खजिनदार गणेश रोकडे यांनी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सहसचिव परवीरकुमार यांची भेट घेत भरतीप्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. या भेटीत संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच भरतीप्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
गेल्या दीड वर्षांपासून खासदार वाजे यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेत दिल्लीत मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. हिवाळी अधिवेशनात खासदार वाजे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत भरतीप्रक्रिया व मुद्रणालय आधुनिकीकरणाचा मुद्दा मांडला. त्यावर मंत्र्यांनी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भरती सुरू करण्याचे, आधुनिकीकरण करण्याचे सकारात्मक उत्तर दिले. सततच्या पाठपुराव्यामुळे कामगार व युनियनतर्फे राजाभाऊ वाजे यांचे आभार मानण्यात आले.