आमदार खोसकरांवर कारवाई अटळ, 'या' नेत्याने दिली मोठी माहिती  file photo
नाशिक

Cross Voting Case : आमदार खोसकरांच्या उमेदवारीवर संक्रांत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विधान परिषद सदस्य निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याच्या चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होत्या. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत मुंबईत स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाचा व्हीप मोडणाऱ्यांवर कारवाई होणारच आहे. असे पटोले यांनी स्पष्ट केले. यामध्ये जिल्ह्यातील त्र्यंबक-इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचे नाव असल्याने त्यांच्या उमेदवारीवर संक्रांत येणार असल्याच्या चर्चा आहेत.

विधान परिषदेसाठी गेल्या महिन्यात मतदान पार पडले होते. यामध्ये काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षादेश झुगारून मतदान केले होते. त्याचा परिणाम उमेदवार पराभूत झाल्यामध्ये झाला होता. एकीकडे सत्ताधारी पक्षाला विरोध करायचा आणि वेळेवर सत्ताधाऱ्यांनाच मतदान करण्याचा काँग्रेसचा डाव लक्षात आल्याने पक्षातील राष्ट्रीय नेत्यांनी हस्तक्षेप करत संबंधितांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित केले होते.

याबाबतीत अनेक दिवस चर्चा झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली येथील बैठकीहून परतल्यानंतर माध्यमांना याबाबत माहिती दिली. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. तळागाळातील कार्यकर्ते ज्यांनी कायम काँग्रेसचा विचार केला त्यांना आता प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांचा सन्मान आता आम्ही करणार आहोत, काँग्रेस हायकमांडने ही माहिती दिली आहे. कोणाला ही आम्ही अभय दिलेले नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे या सातपैकी पाच आमदारांवर कारवाई अटळ असल्याचे संकेतदेखील त्यांनी दिले. यासंदर्भात आ. खोसकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्ह्याचा विचार करता १५ पैकी आ.खोसकर हे काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे आमदार आहेत. बाकी सर्व आमदार हे महायुतीमध्ये सामील आहेत. क्रॉस व्होटिंगमध्ये आ. खोसकरांचे नाव समोर येत असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेते पुढची भूमिका काय असेल याबाबत चर्चांमध्ये रंगले आहेत, तर त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघामध्ये विधानसभेची तयारी करत असलेल्या नेत्यांना प्रचारासाठी मोठा मुद्दा हाती मिळाला आहे.

इच्छुकांची चाचपणी सुरू

महायुती महाविकास आघाडीने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघामध्ये इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये माजी आमदार निर्मला गावित, लकी जाधव यांच्यासह अनेक नेते तयारीत आहेत. खोसकरांची पुढची भूमिका काय असेल, यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT